ST महामंडळाच्या बस मधून प्रवास करत मुंबईत येऊन पोहोचलो आणि दादर बस स्थानकातून रेल्वे स्थानकाकडे जायला निघालो. आज कामाचा पहिला दिवस, त्यामुळे वेळेच्या आधीच पोहोचायचे होते. रेल्वेतून जाताना मुंबईची गर्दी जास्त भयंकर की इथली उष्णता अशा विचारात मी CSTM ला उतरुन मंत्रालयाच्या मार्गावर चालू लागलो. याआधी मुंबईत कधी आलो नव्हतो पण कागदपत्रे पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीच्या वेळी इथे येणे व्हायचे, त्यामुळे इथली ओळख थोडी झाली होती. नोकरदार वर्गाची कार्यालयात पोहोचण्याची घाई बघता बघता मीही त्या गर्दीचा हिस्सा होऊन गेलो. कोणी उशीर होऊन लेट मस्टर लागेल या काळजीने लगबगीने गर्दी सारत पुढे जाताना दिसत होते, कोणी काल जास्त वेळ काम केले म्हणून आज वेळेत सूट मिळवून निवांत सगळीकडे नजरा टाकत चालत होते.
मंत्रालयाच्या प्रशासकीय इमारतीसमोर येताच थोडा वेळ थांबून पाहत राहिलो ते भव्य दिव्य दृश्य. इथपर्यंत पोहोचण्याची पाहिलेली सर्व स्वप्ने पूर्ण होण्याचा तो आजचा दिवस. खुप आनंद उत्साह होता आणि आज काय काय घडामोडी घडतील याची उत्सुकता लागली होती. आतमध्ये गेल्यावर सर्व औपचारिकता माझ्याकडून पूर्ण करुन घेतल्या व मला एक कार्यासन नेमून दिले. इथे माझ्यासारखेच MPSC ची परीक्षा देऊन आलेले बरेच लोक आधीपासून होते. दिवस उलटत गेले तसे मी इथले काम शिकत गेलो. आता मी इथे रूळलो होतो. सध्या तरी कामाचा फारसा ताण जाणवत नव्हता पण ताण वाढलाच तर त्यासोबत दोन हात करायला मी तयार होतो. कार्यालयीन संस्कृतीची काहीच ओळख नसल्याने गोष्टी जड जातील याची खात्री होती पण सहकारी आणि वरिष्ठ चांगले लाभले याचा आनंद होता.
अशाच एका दिवशी मला एक मुलगी जी कार्यालयातच काम करते, ती माझ्यासाठी निरोप घेऊन आली. मला वरिष्ठांनी केबिनमध्ये बोलावले होते. एक नवीन जबाबदारी सरांनी दिली व ते काम काळजीपूर्वक करायचे असे सांगितले. काम करता करता त्या मुलीचा विचार आला. ती तिथे शिपाई पदावर काम करत असल्याचे समजले. तेव्हा शिपाई पदावर तिचे काम करणे मला खटकले. हळू हळू तिच्या स्वभावाची उकल मी करु लागलो. दिसायला छान पण बुध्दीने दिसण्यावर सरशी मारली हे मला समजले तेव्हा मला वाईट वाटले. घरी जाऊन महाजालावर तिची माहिती काढण्याचा प्रयत्न केला असता तिच्या आवडी निवडी आणि बलस्थान मला कळले. महाविद्यालयीन कालखंड तिने गाजवलेला होता. तिकडे कला आणि सांस्कृतिक मंडळाची अध्यक्ष, वेगवेगळ्या चर्चासत्रांचे आयोजन आणि त्यात सहभाग, महाविद्यालयातील एकूण एक कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन शिवाय स्वत: वेगवेगळे छंद जोपासलेत आणि त्यात वाखाणण्याजोग कुशलता प्राप्त असा एकूणच तिचा परिचय मला झाला. ज्या मुलीने महाविद्यालय अक्षरश: उचलून घेतले होते ती इथे मात्र कामात फक्त चोख आहे. सांगितलेले काम नीट पूर्ण करणे आणि कोणाला तक्रारीची संधी न देणे एवढाच तिचा पवित्रा जाणवतो.
का हे काम करत असावी ती? जो चेहरा तिच्या जगात उत्साही दिसायचा, तो इथे निस्तेज वाटतो. मी कल्पना करु शकतो की तिचे जीवन कसे असेल आणि जेव्हा माझ्या कल्पनेत तिचे इतके मुक्तछंद काव्यात्मक जीवन मी पाहतो तेव्हा या कार्यालयीन विश्वात तिची कविता ही वैचारिक गद्यांच्या टेबलावरची धूळ साफ करताना दिसते. का तिने पत्करली असेल ही नोकरी? सरकारी नोकरीसारखे दुसरे सुख नाही म्हणून? की हल्लीच्या घडीला सरकारी नोकरी मिळत नाही म्हणून? लोकसंख्याच इतकी झाली आहे की लोकांना द्यायला नोकऱ्या नाहीत त्यामुळे लोक मिळेल ती नोकरी पत्करत आहेत. पण त्या मुलीचे तिच्या क्षमतांपेक्षा खुपच कमी दर्जा असलेल्या नोकरीवर स्थायी होणे मला खटकत होते. तिला पैशांची गरज असेल का, घरची परस्थिती बेताची असेल का, असे अनेक विचार करुन झालो. बाहेरुन पाहणाऱ्याला अंदाज तरी असेल का की सर्वांची किरकोळ कामे करायला बसलेली ही मुलगी बुध्दिमान कलाकार आहे ते? तेवढ्यात मला माझ्या संगणकाच्या स्क्रीनवर माझे प्रतिबिंब दिसले आणि एका क्षणापुरता माझ्या नियुक्तीबाबत मी साशंक होऊन विचार करु लागलो. माझ्यापेक्षा अधिक योग्य ही मुलगी आहे का? माझ्यापेक्षा हुशार असून ती शिपायाचे काम करत आहे नि मी प्रतिष्ठीत काम. विचार करता करता ती माझ्याकडे वरिष्ठांनी पाठवलेले कामाचे कागदपत्रे देऊन गेली तेव्हा मी तिला थांबवले आणि माझ्याकडचा एक नवा कोरा कवितासंग्रह तिला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दिला आणि शुभेच्छाही.
पुढील भाग लवकरच..
टिप्पण्या