मित्रांची कमतरता मला मी Whats App, Facebook, Instagram वर नाही म्हणून आहे असं काहींना वाटू शकतं. पण मला सर्वांना प्रत्यक्ष भेटून बोलायला आवडतं, ते नाही जमलं तर काॅल वर, ते नाही जमलं तरच मग SMS...असं मी सर्वांना सांगायचो. की मी Social नाहीये म्हणून मी या Social Networking Sites वर नाही. पण हे एवढं सोपं नाही. म्हणजे हे मी Social नाही ते मी असच लोकांनी मला जास्त प्रश्न करु नये म्हणून माझ्या सोयीसाठी त्यांना देण्यासाठी तयार केलेले उत्तर. मला खरंतर भीती वाटते या सगळ्यावर येण्याची. कोणाशी पुन्हा जोडले जाण्याची. जुन्या लोकांशी तर वाटतेच पण नवीन लोकांशी सुध्दा वाटते. आणि या भीतीमुळे मी कशावरच नाही आणि त्यामुळे माझे मित्र म्हणवण्यासारखे सोबती कमी.
एखाद्या संध्याकाळी तुरळक पडणाऱ्या पावसाळी माझा मित्र मला भेटायला येतो. तेव्हा त्याचा थोडासा वेळ पण माझ्यासाठी खुप महत्वाचा वाटतो. त्याने ती रात्र संपवून परत जाऊ नये असं वाटतं. रानातून जाणाऱ्या वाटेला बघायला त्या वाटेवरच्या वळशावर एक बहरलेला वृक्ष असतो. तसं त्याने माझ्या जाण्याने तयार झालेली पाऊलवाट पाहावी आणि त्यावर पडलेली ती ठसे वाचण्याचा प्रयत्न करावा अशी माझी आशा असते. कारण त्या प्रत्येक पाऊलखुणा काहीतरी सांगत असतात.
मला या माझ्या मित्रांना भेटण्यासाठी आणि त्यांचा सहवास लाभावा म्हणून मी या न त्या प्रकारे खटपट करत असतो. ते भेटले की थोडा वेळ का होइना माझी श्वासोच्छवासाची गती सर्वसामान्य पातळीला येते. मला सुखावल्यासारखं वाटतं..
तो निघून जातो तेव्हा मी मागे एकटा उरतो. माझ्या विचारांनी मला थोड्या वेळासाठी दिलेली सुट्टी संपते आणि मग त्याची पाठ फिरुन मी माझ्या वाटेवर चालायला लागताच माझे विचार मला घोळका घालून उभे राहतात आणि एक एक करत माझ्या डोक्यात रांगेत येऊन बसतात.
महेश एलकुंचवार यांनी लिहिलेल्या सोनाटा या नाटकातील एक पात्र मला आठवते. एका इमारतीत तीन अविवाहीत बायका एकाच घरात एकत्र राहत असतात. दिवसभराची सगळ्यांची कामे झाली की रात्री गप्पा मारण्यासाठी खिडकीपाशी येऊन तिघी जणी समोरचे विश्व पाहत उभ्या असतात. समोरच्या इमारतीमधील एका खिडकीमधला दिवा त्यांना रोज रात्री सगळे झोपले तरी चालूच राहताना दिसतो. त्या घरात एक स्त्री राहत असते आणि ती सुध्दा यांच्यासारखीच अविवाहीत असते. घरात एकटी राहणारी ती स्त्री रोज रात्री झोपण्यापूर्वी एक क्रिया एकटीशीच करुन झोपत असे. त्या स्त्रीचं जीवन काय असेल हा विचार त्या करू लागतात आणि तिथेच ते नाटक संपते.
- मयुर
१९ जुलै २०२४
टिप्पण्या