World Suicide Prevention Day

१० सप्टेंबर, जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवसाच्या निमित्ताने..

"मनात चाललेले असंख्य विचार एकदा का आपल्या नियंत्रणाबाहेर गेले की ते प्रचंड वेदना देऊ लागतात आणि तो त्रास शारीरिक व्याधीच्या रूपात दिसू लागला की मग होणाऱ्या त्रासाला कंटाळून माणूस आत्महत्येचा मार्ग पत्करतो."

एखाद्या मयत घराबाहेर, कालपर्यंत हा बरा होता मग आज अचानक त्याने फाशी लाऊन घेतली? काल तर माझ्याशी चांगलं हसून बोलला मग आज इतकं मोठं पाऊल घेतलं ते कसं? मुलीच्या प्रेमात होता का, प्रेमभंग झाला का? अशा चर्चा आपण खुपदा ऐकतो पण मग काय कारण की हे लोक जे बोलतात की आदल्या दिवसापर्यंत ठीक आणि आज मात्र हयात नाही. मला असे वाटते की कालपर्यंत बरा असणारा माणूस हा बरा कधी नसतोच मुळी. त्या माणसाने समाजासमोर ओढलेला तो मुखवटा असतो. त्याच्या मनात सततची वादळे सुरुच असतात. पण माणसात वावरताना त्यांना आपण ठिक असल्याचेच दाखवावे लागते कारण आपल्या मनाचा ठाव इतर लोकांना लागू द्यायचा नसतो. कारण त्यांच्या त्रासावर उघड चर्चा झाल्याने मनावरील जखमा उघडल्या जाऊन आणखी त्रास होण्याचीही भीती त्यांना असते. शिवाय त्यांना अशीही भीती असते की हे लोक आपल्याला समजून घेतील का, की आपल्यावर हसतील? आपल्याला कमकुवत आणि भित्रा म्हणतील?

समाज म्हणून लोकांनी याचा विचार करायला हवा की असे काय झाले असावे की त्याने आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घ्यावा आणि दुसरे म्हणजे त्याला जो काही त्रास असेल त्याबद्दल तो आपल्याला येऊन बोलला का नाही? त्याची समस्या एकून घेण्याची समाज म्हणून आपली योग्यता नाही असे त्याला वाटले असेल का? की कोणी आपल्याला समजूनच घेणार नाही. त्याच्या मनात आलेला Dystopian Outlook हा कोणीच समजू शकले नाही. कारण आपल्या समाजात मनोरुग्ण आणि मानसिक त्रासाला घेऊन लोक निर्बुध्दपणे विचार करतात. मग त्याच्या स्वत:च्या आयुष्य संपवून घेण्याला जबाबदार कोण?

मानसोपचार तज्ञ किंवा समुपदेशक (Councilor) हे एखादी गोष्ट समजाऊन सांगत जरी असले तरी जे मनाच्या तीव्र कड्यावर असंतुलीत होतात ते मृत्यूच्या दरीत स्वत:ला झोकून देणे निवडतात. आपण शहाण्यांनी कितीही म्हटले, कितीही तत्त्वज्ञान त्या घराबाहेर उभे राहून चर्चिले तरी वास्तवात आपण या मानसिक गोष्टींमध्ये किती शिरु पाहतो? अडचण काहीही का असेना पण आत्महत्या हा त्यावरचा उपाय नाही, temporary problem साठी शोधलेला हा permanent उपाय वगैरे बोलून आपण चार लोकांत आपली समज आणि वक्तृत्व फक्त इतरांपुढे मांडू पाहतो. पण ही समस्या समाजातल्या अनेक लोकांसाठी किती गंभीर आहे याची उकल त्या दु:खभरल्या घराबाहेर चार लोकांत काहीतरी बोलावे म्हणून केलेल्या चर्चेत नाही निघणार. आपल्या प्रत्येकाला कामावर जायची आणि इथून सुटका होण्याची काळजी असते आणि ही वृत्तीच समोरच्या माणसाला समजून घेण्याच्या प्रयत्नाला मागे खेचते. प्रत्येकाला आपापले ताण तणाव आहेत आणि त्या नादात आपण आजुबाजुला काय चालले त्याकडे दुर्लक्ष करतो. गोंधळ सर्वांच्या आयुष्यात सुरुच असतो पण या सगळ्यात एखादा या सगळ्यांपेक्षा जास्त मोठ्या तणावात कुजत चालला असेल तर त्याकडे लक्ष दिले पाहिजे आणि नुसते वर वर सांत्वनपर नाही तर त्यांना मदत होईल असे काहीतरी केले पाहिजे.

संदर्भतिला दिलेलं उत्तर या लेखावर जाऊन काही वर्षांपूर्वी घेतलेला या मुद्द्यावरचा आढावा तुम्ही वाचलात तर काही गोष्टी सविस्तर वाचकांना कळतील.

का इतके मोठे पाऊल उचलतात हे लोक?

तर याचे उत्तर एका वाक्यात जरी असले आणि ते वाचकांना पटणारे नसले तरी हेच सत्य आहे कारण हे एका आत्महत्या केलेल्या व्यक्तीने आत्महत्या करण्यापूर्वी केलेले वक्तव्य आहे, " मला हे सगळं इतकं असह्य होतय की एकदाचं सगळं संपवून टाकावं वाटतं." मनात चाललेले असंख्य विचार एकदा का आपल्या नियंत्रणाबाहेर गेले की ते प्रचंड वेदना देऊ लागतात आणि तो त्रास शारीरिक व्याधीच्या रुपात दिसू लागला की मग होणाऱ्या त्रासाला कंटाळून माणूस आत्महत्येचा मार्ग पत्करतो.

शहाणा माणूस यावरही तर्क देण्याचा प्रयत्न केल्यावाचून शांत बसणार नाहीच. कारण आपल्याला सतत काहीतरी बोलायचे असते. पण हे लोक तसे नसतात. यातली बरीच माणसे कोणात न मिसळणारी, एकलकोंडी, अंतर्मुख असतात. क्वतिच काही त्याच्या विरुध्दही असतात पण एकूणच सगळ्याचे कारण एकच की डोक्यात चाललेला विचारांचा गुंता हा या त्रस्त लोकांसाठी इतका तापदायक बनलेला असतो की कोणी समुपदेशक वा मानसोपचारतज्ञ त्यांच्या सल्ला वा औषधाने बरा होणार नसतो, सुटणार नसतो. त्यामुळे अशी माणसे काळाच्या पडद्याआड होणे निवडतात. एकदाच काय ते संपवूया, रोजच्या त्रासापेक्षा हा पर्याय त्यांना निवडावा वाटणे इथेच त्यांच्या जवळच्या आजुबाजुच्या लोकांची हार होते.

'Men Are From Mars And Women Are From Venus' या प्रसिध्द पुस्तकाचे लेखक John Gray यांनी त्यांच्या या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांच्या स्वत:च्या कुटंबात घडलेल्या घटनेबद्दल मन मोकळे केले आहे. ते म्हणतात की काही कारणास्तव माझ्या भावाने आत्महत्या केली आणि त्याला होणाऱ्या त्रासाबद्दल त्याने घरात कोणाला सांगितले नाही. तो एकदा मला येऊन बोलला असता तर मी त्याचे मन वळवले असते. त्याच्या शांत राहण्यातून खरेतर मलाच समजायला पाहिजे होते की माझा भाऊ कुठल्यातरी अडचणीत आहे. पण मी ते समजू शकलो नाही. पण त्यानंतर झालेल्या दु:खातून त्रासातून आणि या घटनेवरून त्यांनी असे ठरवले की इतरांना मी मदत करेल जरी माझ्या भावाचा जीव मी वाचवू शकलो नसलो तरी इतरांना त्यांचे आयुष्य संपवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करेल आणि तसे त्यांनी केलेही.

नंतर येणारा मुद्दा की आयुष्य संपवण्यासाठी बनलेले यांचे कारण काय?

पुन्हा आपण त्या घराबाहेर उभ्या असणाऱ्या लोकांचे ऐकू. यातील सर्वात जास्त आत्महत्या ह्या कोणी जवळची प्रिय अशी व्यक्ती सोडून गेल्यामुळे केलेल्या असतात, कोणाचे करीअरमध्ये आलेले अपयश, कोणी सासरी होत असलेल्या त्रासाला कंटाळून करते तर कोणी शेतकरी असेल तर तो कर्ज आणि शेतीतून झालेल्या त्रासाला कंटाळून करतो आणि याहीपेक्षा अनेक वेगळी कारणे देखील आहेतच. मग पुन्हा लोक त्या त्या कारणावर त्याला ही किती छोटीशी गोष्ट आहे असं म्हणवून हिणवतात. एवढ्याशा गोष्टीवरुन इतकं मोठं पाऊल उचलणं? छे! गेली सोडून तर गेली, जाऊदे. अजून खुप चांगल्या मुली मिळतील वगैरे त्यांचे ते चालू असते. आता मुव्ह-ऑन होणे हे आपल्याला कितीही बरोबर वाटत असले तरी प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते आणि त्या मानसिकतेबरोबर राहणारा तो माणूस आणि त्या विचारांशी त्याची जोडणी ही आणखी वेगळी. एकाच घरातल्या प्रत्येक सख्ख्या सदस्याचे जनुके (DNA) जसे वेगळे तसच प्रत्येकाची एखाद्या भावनेला प्रतिक्रिया देण्याची प्रक्रिया आणि निर्णयक्षमता वेगळी. जशी प्रत्येक माणसे संवेदनशील असतात तसच आत्महत्या करणारी माणसे संवेदनशीलतेच्या बाबतीत तीव्र भावना अनुभव करणारी असतात.

वाचकांना वाटत असेल की आपण या व्यक्तीपेक्षा जास्त तणावात आहोत. यापेक्षा जास्त दु:ख आपण भोगतोय पण आपण तर असं कधी केलं नाही आणि करायचा विचार देखील मनात आणणार नाही. आता ज्या गोष्टी आपल्याला सोप्या वाटतात त्या त्यांच्यासाठी सोप्याच असतील असा आग्रह धरणे चुकीचे.

आणखी एक मुद्दा म्हणजे लोक दुःखाची तुलना करतात. माझा मित्र मला त्याच्या एका मित्राचे उदाहरण सांगत होता की राकेश (नाव बदलेले आहे) त्याला एक मुलगी सोडून गेली अगदी लग्न ठरणार असताना. जीवापाड प्रेम केलं त्याने पण तिने शेवटी नकार दिला. आता मग त्याने काय करावे? त्याने पण आत्म्यहत्या करावी का? तो पण तर जगतोय. त्याच्याइतकी tragedy मी कोणाचीच नाही पाहिली. मी म्हटलं त्याला की एक लहान बाळ वर्ष दीड वर्षाचं आहे. ते एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करत असेल एखाद्या खेळण्यासाठी किंवा खायच्या पदार्थासाठी. त्याच्या पालकांनी त्याला ते नाही दिले तर तो टाहो फोडतो. इतका रडतो इतका रडतो की त्याचं नाक, डोळे लाल होतात. छातीत दुखायला लागतं, खोकतो पण त्याला काही त्याचे पालक ती वस्तू देत नाही. मग त्याचं ते रडणं इतकं वाढतं की मग त्याला ते दिलं जातं. आता मला सांग की तुझ्या मित्राचं दुःख मोठं की या बाळाचं? तुझा मित्र तर या बाळासारखा रडलाही नसेल. रडून रडून त्याच्या छातीत एवढं दुखायलाही लागलं नसेल. बरं आणखी एक उदाहरण घेऊ. कोरोना काळात माझ्या एका मित्राचे वडील गेले. घरातला कर्ता पुरुष जाण्याने घरातल्या सर्व सदस्यांवर दुःखाचा डोंगर जणू कोसळला. मग याला काय म्हणायचं? तुझ्या मित्राचं दुःख मोठे, त्या बाळाचे दुःख मोठे की एका माणसाच्या जाण्याने या तिघांना मिळून झालेले दुःख मोठे?

दुःख हे दुःख असते. ते मोठे किंवा दुय्यम अश्या वर्गीकरणात बसवू नये. त्या लहान बाळाचे दुःख आपण केवळ रडणे आणि बालिश हट्ट असे म्हणून सोडून द्यायला बघतो पण त्या बाळासाठी तो त्याचा जीवन मरणाचा प्रश्न का असू शकत नाही? आपण दुःखाचे कारण जेवढे मोठे तेवढे ते दुःख मोठे असा तर्क लावतो. मग त्या दृष्टीने पाहिले तर बरीच माणसे आपल्याला सुखी दिसायला हवीत. पण तसे नाही. कारण सर्वेक्षणानुसार भारताचा संपूर्ण जगात आनंदी माणसे असण्याच्या जवळपास २०० देशांच्या यादीत १२६ वा क्रमांक लागतो. जिथे पहिला क्रमांक म्हणजे खुप आनंदी आणि शेवटचा क्रमांक म्हणजे खुप दुःखी. आता हे फक्त आपल्याला अंदाज येण्यापुरता याचा विचार करा. ते सर्वेक्षण किती बरोबर किती चूक हा विचार नका करू. म्हणजे ढोबळमानाने आपल्या देशात आनंदी माणसांचे प्रमाण तुलनेने कमी आणि दुःखी माणसे जास्त प्रमाणात आहेत. याचा उहापोह करायला नंतर आपण स्वतंत्र विषय घेऊ. सध्या विषय असा की आत्महत्या करताना त्या मानवी मनाची वृत्ती ही अंतर्मुखही असू शकते किंवा बहिर्मुख. पण एकदा का माणूस त्याच्यासोबत घडणाऱ्या घटनांशी मेळ घालण्यात कमी पडू लागला आणि त्या घटना त्याच्यावर हावी व्हायला लागल्या की तो त्या घटनेला म्हणजेच पुढे येणाऱ्या दुःखाला शरण जातो आणि मनाने कमकुवत व्हायला लागतो. या सर्वाचे पर्यवसान हे मानसिक ताण आणि नैराश्यात होते. अशा व्यक्तीचे दिवस हे चिंता (anxiety) करण्यात आणि घडलेल्या किंवा भविष्यात घडू शकतील (ज्या घडल्याच नाही किंवा कदाचित घडणार सुद्धा नाही) अशा गोष्टींचा विचार करण्यात आणि अतिविचार करण्यात जातात.

उपाय काय मग?

काही लोक आपल्या माणसाला त्या दुःखापासून दूर करण्यासाठी त्याला सिनेमा बघायला घेऊन जातात. फिरायला घेऊन जातात. त्याला त्याच्या आवडीच्या गोष्टींमधे मन रमवायला सांगतात. हा खुप साधारण उपाय आहे. जो प्रत्येकांसाठी नसतो. सिनेमाला गेल्यावर अशी व्यक्ती तेवढ्यापुरता दुःख विसरेलही. पण त्या सिनेमाचे ३ तास झाले की तो पुन्हा त्याच्या दुःखात खेचला जाईल आणि अशा वेळेला आपण कितीही आपल्या आवडत्या गोष्टी करुन दुःख पालटण्याचा प्रयत्न केला तरी आपले मन लागत नाही. जबरदस्ती मन तिथे लावून ते लागणार नाही. या मन वळवण्याच्या गोष्टींना दुःखावर पांघरुन टाकणे म्हणतात. तुम्ही कितीही सिनेमा दाखवा. सिनेमा पाहताना त्या व्यक्तीच्या दुःखावर चादर असेल पण सिनेमा संपला की चादर बाजुला सरेल आणि दुःख जे खाली तसेच असते झाकलेले ते पुन्हा वर येईल. या तात्पुरता केलेल्या उपायांनी काही व्यक्तींना त्याचा फायदा होऊ शकेल. पण काही व्यक्तींना त्यांच्या नैराश्यातून बाहेर काढणे सोपे नसते. समाज म्हणून त्याच्या जवळच्या व्यक्तींनी होईल तेवढे त्या व्यक्तीला एकटे सोडू नये. त्याच्याशी मनमोकळ्या गप्पा कराव्यात. त्याच्या समस्या ऐकून घ्याव्यात. कदाचित त्यावर उत्तरे तुमच्याकडे नसतील. पण ऐकून घेणे सुद्धा खुप मदतीचे ठरते. प्रशिक्षित मानसोपचारतज्ञ, समुपदेशक यांची मदत घेणे कधीही चांगले. तुम्ही जर धार्मिक असाल तर धार्मिक साहित्य वाचणे आणि मन सद्विचारांनी भरणे फायद्याचे ठरते. दुःख हे अपेक्षांच्या अपूर्ततेने जीवनात येते. अपेक्षा न ठेवणे आणि कर्म करत राहणे हे सूत्र पाळावे आणि अहं चा त्याग हा या सर्वात महत्वाचा भाग. या गोष्टी समजण्यासाठी प्राचीन साहित्य वाचावे. तुम्ही धार्मिक असाल किंवा नसाल तरी ध्यानधारणा (meditation) करणे कधीही चांगले. याचे प्रत्येक धर्मात वेगळे प्रकार आहेत. ज्याला जो फायद्याचा वाटेल त्याने तो करावा. पण श्वासावर लक्ष ठेवण्याचे ध्यान यापासून सुरुवात करावी. एक गोष्ट लक्षात ठेवावी की सर्व गोष्टी आपल्या मनापासून सुरु होतात आणि मनापाशी संपतात. हा लेख वाचून तुम्ही तुमच्या आजुबाजूला असे काही मानसिक तणावात असलेले तुमचे मित्र मैत्रीण नातेवाईक कोणी असतील तर त्यांच्याशी त्यांच्या पातळीवर जाऊन बोलण्याचा नक्की प्रयत्न करा. स्वतःची मते बाजुला ठेवून फक्त त्यांना ऐकून घेण्याचा प्रयत्न करा. फक्त आनंदाचे सोबती नका राहू. दु:खातही स्वतःहून फोन करा, भेटायला जा. समाजात काहीतरी योगदान द्या.








टिप्पण्या

Pallavi म्हणाले…
फार सुंदर लेख आहे.. आजच्या धकाधकीच्या जीवनात 'मानसिक आरोग्य' ही एक महत्त्वाची बाब बनली आहे..या महत्त्वाच्या विषयावर लेख लिहून तुम्ही हा विषय प्रकाश झोतात आणून समाजामध्ये जागरूकता निर्माण करत आहात.. त्यासाठी तुमचे खूप आभार.. आणि असेच सुंदर लेख तुम्ही लिहावे यासाठी खूप खूप शुभेच्छा..😊
Mayur SP Nisarad म्हणाले…
तुमच्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद 😊