२१ सप्टेंबर, जागतिक शांतता दिवसाच्या निमित्ताने..
Peace cannot be kept by force. It can only be achieved by understanding. - Albert Einstein
हिरोशिमा आणि नागासाकी सारखे प्रचंड महाविस्फोट घडवून आणल्या पासून प्रत्येकाला अणुशक्तीचे भय आणि महत्व कळाले. ज्याच्याकडे अणु स्फोटके जास्त तो देश लष्करीदृष्ट्या जास्त शक्तिशाली. त्यामुळे आज घडीला सर्व मोठी राष्ट्रे अणुशक्तीला (Nuclear Power) घेऊन स्वतःला जास्तीत जास्त स्वयंपूर्ण कसे होता येईल याकडे लक्ष देतात. त्याचे कारणही तसेच. तुमची कितीही जरी इच्छा नसली तरी बाजूचे राष्ट्र जर अर्थसंकल्पात लष्कर या घटकाला सर्वोच्च प्राधान्य ठेवून करोडो रुपयांची रक्कम या एकाच मोठ्या भागासाठी वळती करत असतील आणि एका पेक्षा एक प्रगत अणू चाचण्या घेत यशस्वी झाल्याचे वृत्त प्रसारित करत असतील तर स्वसंरक्षणाखातर स्वतःसही यावर किमान तितक्याच समांतर ताकदीने काम करावे लागते ही वस्तुस्थिती.
आणि हल्ली कोणाला शांतता नकोच आहे. कारण शांतता प्रस्थापित झाल्यास शस्त्रास्त्रे बनवण्याची जी भली मोठी बाजारपेठ आहे तिचे अस्तित्व धोक्यात येते. जे अर्थकारणातल्या जगाची एक टक्का लोकसंख्या व्यापून असलेल्या बड्या उद्योजकांच्या नुकसानीस कारणीभूत होईल. पुढच्या काही वर्षात महायुद्ध होणार नाही असे जरी आपण मानून चाललो तरी ते होणारच नाही याची शाश्वती कोणत्याच देशाला देता येणार नाही आणि भविष्यात कधीही आकाशातून काळ कोसळू शकतो म्हणून येणाऱ्या युद्धाची तयारी म्हणून त्याच अर्थसंकल्पातील लष्करी भागातील पैशे हे आपल्या जवानांवर, त्यांच्या खाण्या-पिण्यावर, त्यांच्या पगारावर, त्यांच्यासाठीच्या प्रशिक्षणावर, त्यांच्या बंदुका आणि काडतुसांवर खर्च होतात शिवाय मोठे रणगाडे, लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, लढाऊ जहाजे आणि पाणबुड्या आणि त्यांवर बसवलेली अणुशक्तीने सज्ज अशी क्षेपणास्त्रे इत्यादींवर खर्च होतात.
आता एखाद्याला वाटेल की भारत जो ४,५४,७७३ कोटी रू. फक्त डिफेन्सवर खर्च करतो पण मग तेच तो सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून आत्महत्या का थांबवत नाही? शिक्षण आणि आरोग्यावर जेमतेम निधी का दिला जातो? काही वर्षाने होणाऱ्या युद्धापेक्षा आत्ताच्या सरकारी शाळा आणि सरकारी दवाखाने तसेच एकूणच शिक्षण आणि आरोग्य सुविधांना बघता यावर खर्च करणे कधीही योग्यच. तमाम सरकारांची इच्छा असूनदेखील त्यांना ठोस पावले उचलणे अशक्य होते. त्यांचे असे न करण्यामागे ते अनेक तर्क देतील पण नागरिक म्हणून ज्यांना देशात आणि जगातही शांतता नांदावी अशीच मागणी आहे त्यांचेच न ऐकता जे काही मोजके लोक देश चालवतात त्यांच्या संगनमताने काही गोष्टी घडत नसतील कशावरून! कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे शांतता प्रस्थापित होऊन अनंत लोकसंख्या सुखात राहील पण त्या एक टक्के अब्जाधीशांच्या सुखावर मर्यादा येईल जे होणेच अशक्य. म्हणजेच युद्ध हे चालू ठेवले जाते आणि ते विचारपूर्वक चालू ठेवले जाते.
सामान्य नागरिकांच्या मनात देशभक्तीचे जाज्वल्य गीत गुणगुणत ठेवणे आणि त्या जोरावर सैन्य भरती करणे आणि मग देशभक्ती ने ओतप्रोत भरलेले हे आपल्यातलेच जवान फक्त राष्ट्र प्रथम या भावने खातर शहीद व्हायला तयार असतात. त्यांच्या शहीद होण्याने आपण दुःखी होत राहतो पण एका मोठ्या ध्येयासाठी त्यांचे गेलेले ते बलिदान होते, जे वाया जाणार नाही, शहीद होण्याचे त्यांना मिळालेले ते भाग्यच आहे असे बोलून त्यांच्या आई वडील आणि नातेवाइकांसह आख्या देशाची फक्त समजूतच काढली जाते. "युद्धाच्या मागे राष्ट्रातील सर्व लोकांचा सामूहिक विचार नसतो, त्यामागे एकाचाच विचार असतो आणि बाकीचे त्यात पिचले जातात."
आपण सुविचारांमधे एक वाक्य सतत ऐकत आलोय की युद्ध नको, बुद्ध हवा. पण ज्या सर्व लोकांना तो हवा आहे त्याच लोकांच्या मतदानाने सरकार निवडले जाते. एखादे वेळी ते सरकार कितीही चांगले निवडले तरी ते भ्रष्ट होण्यास जागा असतेच त्या ठिकाणी. जोसेफ डे माइस्त्रे या विचारवंताने सांगितले होते की, "लोकशाहीमध्ये लोकांना तेच सरकार मिळते जी त्यांची लायकी असते."
आपल्या देशात जर पाहिले तर छोट्या मोठ्या युद्ध वजा चकमकी होणाऱ्या घटना अनेक. देशाच्या उत्तर पश्चिम सीमेला पाकिस्तान आणि उत्तर पूर्व सीमेला चीन हे दोन देश दोन्ही बाजूने पाळी पाळीने मनस्ताप देत आहेत. त्या व्यतिरिक्त दहशतवादी आणि अतिरेकी संघटना सुध्दा आहेतच आणि मधल्या मधे नक्षलवादी आहेत जे देशाला आतून खिंडार पाडत आहेत. इत्यादी सगळ्यांमुळे देशाचा लष्करी अर्थसंकल्प हा इतर गोष्टींपेक्षा जास्त असणे रास्त वाटेलही. कारण जिवंतच नाही राहिलो तर मुलांना खायला काय देणार आणि शिकवणार तरी कसे? या सगळ्यातून नकळत इतर देशांबद्दल द्वेष निर्माण होतो आणि 'स्व' राष्ट्राबद्दल अभिमान. आणि यातून देशभक्तीची एक भावना मनात रुजते त्यावर जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी वास्तवाचे प्रतिपादन केले आहे. ते म्हणतात, "my nation is better than yours because I'm born in it."
Armed Forces (BSF, ITBP इत्यादी), लष्कर, पोलिस या सर्व गोष्टी कुठून जन्मल्या. इतिहासात जर पाहिले तर भारता पुरता विचार केल्यास शेवटची ज्ञात सिंधू संस्कृती लक्षात येते, ज्यामधील हडप्पा आणि मोहेंजोदडो या नगरांच्या उत्खननात कुठलेही शस्त्र सापडलेले नाही. म्हणजेच तेव्हा कुठेच आक्रमण देखील होत नसावे. आणि शस्त्रे सापडले जरी असतील तरी ती स्वसंरक्षणाखातर बाळगायची शस्त्रे होती. ज्यातून लोकांचा नरसंहार कदापि शक्य नाही. मग या मधल्या काळातच असे काय बदल झाले की पिक खुरपायच्या विळ्यापासून आपण आता अणुबॉम्बचा साठा वाढवून बसलो. याचे उत्तर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. कारण पुढच्या लेखात यावर सविस्तर विचार होईल.
जागतिक शांतता प्रस्थापित होण्यासाठी मुळात शांतता हवी आहे का हे विचारणे महत्वाचे. आणि ती हवी असल्यास त्यासाठी कुठल्या एका देशातल्या काही लाखभर करोडो करोडो कोटी लोकांना वाटून काहीच होणार नाही. सर्व देशांनी एकत्र येऊन जागतिक संघटन करून नीती अवलंबिली पाहिजे. सद्ध्या जरी अशा संघटना (संयुक्त राष्ट्र संघटना) असतील ज्या चांगल्या काम करत आहेत पण पूर्ण यशस्वी होण्यासाठी अजुन त्यांना अवकाश आहे.
टिप्पण्या