विकास : १०-१५ हजारात बाजारात गरज भागवणारे मोबाईल फोन मिळत असताना लाखांचे फोन वापरणे, कशासाठी? संदेशवहन (Connectivity) झाले पाहिजे, कॉल मेसेज, कॅमेरा, गाणी, वेळ घालवण्यापुरता एक दोन हलके फुलके गेम्स. पण Interests वर असतं सगळं ज्याला जे आवडतं, हवं असतं ते ते तो करतो.
विवेक : बरोबर, पण प्रत्येकवेळी हा Interests आणि आवडींचा नियम आपण सरळसोट नाही लावू शकत.
विकास : म्हणजे?
विवेक : जोपर्यंत आपले Interests आपली Choice ही दुसऱ्याच्या जीवापर्यंत येत नाही.
विकास : म्हणजे?
विवेक : तुम्ही मांसाहारी आहात की शाकाहारी?
विकास : हो. मांसाहार करतो मी. मला आवडतं आणि प्रथिने सुध्दा जास्त मिळतात त्यातून.
विवेक : Exactly. हेच मी सांगतोय. " तुमच्या Choices, तुमच्या आवडीनिवडी या दुसऱ्या जीवाची Life कशा असू शकतात? "
विकास : अहो पण माणूस मिश्रहारी आहे. फार पूर्वीपासून तो सर्व खात आलाय. आणि संख्येचाही मुद्दा आहेच की, या प्राण्यांवर नियंत्रण राहणे एकूणच काय की, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी हे करावं लागतं. बरं, तुम्ही नाही करत का मांसाहार?
विवेक : नाही.
विकास : का?
विवेक : कारण Survival takes lives and I am not a survivor. माणूस जरी मिश्रहारी असेल आणि तो जरी अगदी मानवी उत्क्रांतीकालाच्या आधीपासून शिकार करत आला असेल तरी ती तेव्हाची गरज होती. शेतीचा शोध लागल्यानंतर ती गरज संपली. माणूस स्थिरावला आणि त्याला त्याचे अन्न स्वत:ला मातीतून उगवता आले. मग माणसाने धर्म निर्माण केला आणि त्यातून चांगल्या वाईटाची शिकवण धर्मग्रंथांतून आणि पुढे संतांचे अभंग, ओव्या, कीर्तन इत्यादी साहित्यातून दिली. जंगलातून भटकणाऱ्या मनुष्याला नीती शिकवली आणि त्याच्यात संयम पेरून सदाचाराचे आचरण त्याच्यात रुजवले. पण तरीही लोक स्वत:ला हवं तेच करतात आणि सबब म्हणून Free Will चा दाखला देतात. मुक्त इच्छेच्या नावाखाली आपण काहीही नाही ना करु शकत.
राहता राहिला तुमचा दुसरा प्रश्न की निसर्गाचा समतोल राखण्यासाठी लोक मांसाहार करतात. तर मला असं वाटतं की आपण ठेका नाही घेतला निसर्गाचा समतोल (अशा प्रकारे) राखण्याचा. कोंबड्या बकऱ्या जास्त झाल्यात तर ते तुम्ही वाघाला आणि चित्त्यांना खायला देऊन त्यांची संख्या वाढवू शकता. अति संकटग्रस्त आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले प्राणी त्यामुळे समतोलात तरी येतील.
आधी सर्व एकमेवाद्वितीय प्राणी पक्षी या पृथ्वीतलावरुन माणसाने कळत नकळत संपवून टाकले (ते कसे तर अश्मयुगापासून तो जो टोळ्या करुन अन्नाच्या शोधात भटकत जगायचा तेव्हा एका खंडात अन्न संपले की दुसऱ्या खंडात आणि तिथले अन्न संपवले की त्याच्या पुढच्या खंडात अन्नाच्या शोधात जायचा. Basically प्रांण्याच्या शोधात भटकायचा.) आणि आता जेव्हा त्याला आपण किती मोठी चूक केली हे लक्षात आले तेव्हा त्याने प्राणीजगताला कायदेशीर संरक्षण प्राप्त करुन दिले. पण जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीसाठी त्याने काही प्राण्यांना सोयीस्कररीत्या आपल्या अंमलाखाली ठेवले.
त्यासाठी आपण इतर खुप उपाय आणि प्रयत्न केले आहेत आणि ते आणखी चालूच आहेत. Wild Life Protection Act (1972) यांसारखे कायदे आणले, IUCN ची Red List झाली, व्याघ्र प्रकल्प आणले, पक्षी अभयारण्यांची स्थापना, वन्यजीव अभयारण्यांची स्थापना केली. आता तरीदेखील बकऱ्या-कोंबड्यांना यात संरक्षण नाहीये कारण त्यांना यातून सोयीस्कररीत्या वगळण्यात आले आहे. हा खुप मोठा विषय होतो पण इतकंच समजून घ्या की या पाळीव प्राण्यांना पशुधन समजले जाते आणि हा 'Economy' चा (अर्थकारण) महत्वाचा भाग बनला आहे देशोदेशीच्या सरकारांचा.
विकास : तुम्ही म्हणालात Survival takes lives. पण मग तुम्ही तुमचे जे शाकाहारी अन्न मिळवता ते ज्या वनस्पतींपासून येते त्यात सुध्दा जीव असतोच की. झाडांमध्येही जीव आहे.
विवेक : सगळ्यात आधी मी हे स्पष्ट करतो की, मी स्वत:ला आस्तिकही म्हणवत नाही आणि नास्तिकही. तसेच मी कुठलेही धर्मग्रंथ वाचून तुम्हाला कोणतच ज्ञानही पाझरत नाही. "I'm just a Human Being with no altered philosophy." आता, पहिला मुद्दा तर जेव्हा तुम्ही एका बाजुला मुक्या प्राण्याला मारुन खाण्याच्या घटनेची तुलना फळभाज्या, पालेभाज्या यांसोबत करता आणि तर्क हा देता की वनस्पती सुध्दा सजीव आहेत, त्यांच्यात जीव आहे म्हणजे हत्या तर तिथेही आलीच की. तेव्हा ही तुलना किंवा हा तर्क बुध्दिप्रामाण्यवादाच्या पातळीवर तार्कीक नाहीये हे आधी लक्षात घ्या.
मुक्या जनावरांच्या क्रूरतेने घेतलेल्या हत्येमध्ये वेदना हा मुख्य विचार असतो. तिथे पशु पक्ष्यांचे वेदनेने तडफडणे, जिवाच्या आकांताने विव्हळणे, तो त्रास, छळ या गोष्टी विचारांपलीकडच्या असतात. तिथे तुम्ही हे काम खाटीकाकडून करवून घेता, तुम्हीसुध्दा नाही करत ते कारण तो माणूस वेदनाशून्य आणि असंवेदनशील असतो. कत्तलखान्यात किंवा ग्रामीण भागात हळदीसमारंभात, देवाला बळी देताना एखाद्या बकऱ्याला हलाहल करुन मारले जाते ते दृश्य पाहिल्यावर तुम्ही हळवे होता कारण तुम्ही संवेदनशील आहात. वेदनेची जाणीव तुम्हाला असते म्हणून त्याप्रसंगी तुम्ही लहान मुलांना सुध्दा घरात जायला सांगता. का असं करता तुम्ही? कारण जे काही आहे ते अमानुष आहे आणि वेदनांचा सडा रक्ताच्या रुपात सांडतो हे तुम्हाला पटतंच ना. मग या अतुलनीय (तुलना न करता येणारे) गोष्टींची तुलना भाज्या आणि फळांसोबत कशी होणार? बरं मला सांगा, माणसाला जीवन जगण्यासाठी काहीतरी खावं तर लागणारच. तुम्ही असंही म्हणाल की शेती करताना मातीतील कित्येक जीव जंतू मारले जातात, घरे उभारताना, रस्ते बनवताना कित्येक झाडे नष्ट होतात. तिथेही जीव जातोच झाडांचा. सजीवांची आणि एकूणच पर्यावरणाची हानी तर सर्वांतच आहे पण म्हणजे काय आपण खाणे आणि जगणे तर नाही सोडू शकत. जगण्यासाठी काही तरी अन्न स्वरुपात खावेच लागणार त्यामुळे याचा अर्थ असा नाही की मुका जीव मारुन खावा. आपण तिथे त्यातल्या त्यात कमी 'हानी'कारक पर्याय निवडतो. शाकाहार आणि मांसाहार यात तार्कीक वाद चालतो तेव्हा या मुद्द्यांचे नेहमी भांडवल केले जाते जो तर्काच्या आणि विवेकबुध्दीच्या पातळीवर उभाच राहत नाही.
मी विस्ताराने सांगतो. तुम्ही रेल्वेने प्रवास करता तेव्हा समोरचा माणूस काही वस्तू कचरा म्हणून खिडकीतून बाहेर फेकून देतो. तुम्ही समोरच बसलात आणि तुम्ही काहीतरी खाल्ल्यावर तुम्हीही खाण्याचे उरलेले पाकीट खिडकीतून बाहेर फेकता. शिवाय कचरा करु नये वगैरे नियमांशी तुम्ही परिचीत आहात तरीदेखील तुम्ही तो कचरा कचराकुंडीत टाकण्याचा किंवा त्याची जी काही योग्य विल्हेवाट असेल ती लावण्याचा कंटाळा करता. बरं त्याच डब्यात मी, विवेक प्रवास करतोय आणि मी तुम्हाला विचारले की तो कचरा कशाला बाहेर टाकला तर तुम्ही तुमचा 'विवेक' मला सांगाल की कचरा सगळेच करतात, मी केल्याने त्यात अशी कितीशी भर पडणार? तसेच लग्नसमारंभात पूर्वी भला मोठ्ठा मातीचा रांजण मांडवात असायचा, हल्ली छोट्या छोट्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा खप पडलेला असतो हॉलभर. कारण काय तर पाहूण्यांची गैरसोय होऊ नये. पाण्याची सोय सुध्दा कार्यात नीट नव्हती अशी मागून खोचक टीका करणारे खुप नातेवाईक आपल्या आसपास असतात. आणि तेव्हा विचारले असता हेच उत्तर येते की घरातलं पहिलच कार्य आहे, घरातलं शेवटचं कार्य आहे तर थाटात आणि विनाविघ्न झालं पाहिजे. या तर्कानुसार गेलो तर देशातल्या अशा सर्व पहिल्या आणि शेवटच्या लग्नाचा विचार करता किती प्लास्टिक जमा होत असेल याचे वजन करण्यासाठी वेगळे एकक शोधावे लागेल.
मला असं वाटतं की आपण आपल्या बुध्दीशी प्रामाणिक असले पाहिजे. पु. ल. देशपांडेंची एक कविता सुध्दा यावरच आहे. त्यात ते हेच म्हणतात की "आहे बुध्दीशी इमान..?" "मानव जर स्वत:ला निसर्गाच्या वरती समजतो तर त्याचे तर्क सुध्दा उच्चकोटीचे असले पाहिजेत. हिंसा जर प्राण्यांच्या जगतातला नियम आहे तर अहिंसा हा मानवाच्या जगतातला प्राकृतिक नियम आहे."
विकास : तुमचे विचार खुप Extreme आहेत.
विवेक : हे Extreme किंवा अतिरेकी विचार नाहीत. याला फार चांगला शब्द आहे आपल्या भाषेत तो म्हणजे 'अतिबुध्दीप्रामाण्यवाद'. बरं लोक त्या गोष्टींचा नेहमी विरोधच करतात ज्या गोष्टी एकतर त्यांना समजायला कठीण तरी जातात किंवा त्या गोष्टी समजून घेऊन त्यावर विचार करणे, सद्सद्विवेक बुध्दी वापरणे हे परिश्रम घेणे त्यांना कंटाळवाणे वाटते.
विकास : मी Gym मध्ये व्यायाम करतो त्यामुळे माझ्यासाठी Proteins खुप महत्वाचे आहेत. मला हे सर्व खावंच लागतं आणि शाकाहारी अन्नातून मला हव्या तेवढ्या प्रथिनांची गरज भागवली जात नाही.
विवेक : व्यायाम मी सुध्दा करतो. पण मी शाकाहारी म्हणजे प्रथिनांचे जे वनस्पतीज स्रोत आहेत त्याचे सेवन करतो. "तुमच्या शरीराचा 'विकास', तुमच्या प्रथिनांची गरज ही दुसऱ्या जीवाची Life नसायला पाहिजे. माझ्या शरीराच्या ताकद आणि मजबूतीसाठी मी दुसऱ्या जीवाची किंमत मोजतो हे मला योग्य नाही वाटत." आणि मगाशी तुम्ही म्हणालात की प्रत्येकाची वेगळी मते असतात, Choice असते, पण इथे मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की एखाद्या मरणाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या प्राण्याचे आयुष्य ही तुमची 'Choice' आहे. म्हणजे Choice या एका शब्दावर तुम्ही घरबसल्या ऑनलाईन कुठल्यातरी संकेतस्थळावरुन काहीतरी मागवता व या (ती माझी Choice आहे) Interests खाली तिकडे एक जीव भांड्यात पडतो. प्रत्येकाचे Interests वेगळे असतात मान्य. पण तुमच्या Interest वर एखाद्याचे जगणे मरणे अवलंबून झाले आहे याकडे किती लोक लक्ष देतात. लग्नकार्यात पण मुलीकडच्यांना/मुलाकडच्यांना वाईट नको वाटायला वा त्यांचा मान ठेवण्यासाठी म्हणून ज्यांना हा मांसाहार पटत नाही तरीसुध्दा असे लोक Non Veg ची दावत ठेवतात. आम्हाला हे पटत नाही एवढं बोलण्याची हिम्मतदेखील त्यांच्यात नसते मग तिथेसुध्दा पाहूणचाराच्या नादात कित्येक बळी जातात. कशासाठी तर फक्त Choice आणि Interest साठी, त्यांना ते आवडतं यासाठी.
साधी गोष्ट आहे.. की पोट तर शाकाहारी जेवणाने पण भरते. तरीदेखील Non-Veg खातातच ना लोक. शाकाहारी जेवणातून पण सर्व प्रथिने, कर्बोदके आणि इतर महत्वाची पोषद्रव्ये मिळतात. पण Non-Veg हा Interest चा आणि एका अर्थाने Luxury चा मुद्दा झाला ना. जसं iPhone वापरणारे हे त्यांचे त्यातील Interest आणि Luxury आणि मग इतरांवर त्या फोनमुळे पडणारा आपला प्रभाव या गोष्टी पाहतात. तसच भाजी-चपाती, वरणभाताने पोट स्वस्तात भरुन स्वास्थ्य निरोगी राहत असतानादेखील ज्यादा पैशे देऊन Quality Proteins च्या नावाखाली जिभेचे चोचले पुरवले जातात. शेवटी हे बाकी काही नसून एक Desire (वासना) आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
तसाच एक दुधाचाही थोडा वेगळा पण महत्वाचा मुद्दा आहे. Vegan food or Veganism ही एक संकल्पना तुम्ही जाणून असाल. काही लोक प्राण्यांवर मानवाकडून होणाऱ्या अमानुषतेला घेऊन Veganism कडे वळत आहेत. त्यांचे म्हणणे असे की दुध आणि दुधापासून बनलेले इतर सर्व पदार्थ हे माणसाचे अन्न नाही. स्त्रिच्या बाळंतपणात बाळाला पाजण्यापुरताच त्याची आवश्यकता पण त्याचे उत्पादन गाई म्हशींकडून मोठ्या पातळीवर वाढवणे आणि ते वाढवत असताना प्राण्यांचा खुप छळ होणे सर्वसामांन्यांना माहीत नाही असे नाही. प्राण्यांच्या कातडी पासून चामडे लेदर बनवण्याची बाजारपेठसुध्दा मोठी आहे. तिथेही अपंग किंवा भाकड जनावरांसोबत कसा दुर्व्यवहार केला जातो हे एकदा देवनार सारख्या कत्तलखान्यात जाऊन पाहा किंवा इंटरनेटवरुनही याची माहिती मिळेल. आणि मी वन्यजीव संरक्षण अधिनियमाअंतर्गत येणाऱ्या प्राण्यांबद्दल अजुन बोललोच नाही. की जिथे पशुपक्षांची तस्करी होते, त्यांची शिंगे किंवा हस्तिदंतांसाठी शिकार होते, लेदरसाठी तसेच चुकीच्या प्रथा आणि अंधश्रध्दामुळे त्यांना मारले जाते. बरं नुसता दुधाचा मुद्दा घेतला तरी भारतासारख्या देशात जिथे एक कमाल खाद्यसंस्कृती नांदते अशा देशात लोकांनी दुधावर साधक बाधक चर्चा करणे म्हणजे अरण्य रुदनच.
तर परत एकदा Interests, Choices, Free Will हा मुद्दा पृथ्वीवर आणि आता पृथ्वीबाहेरही मानवाच्या सर्वोच्च असण्याचा Superior असण्याचा आहे आणि त्यामध्ये माणसाने ते सर्व केले आहे जी त्याने करण्याची इच्छा बाळगली आहे. त्याने जंगलातल्या Apex Predator ला म्हणजेच वाघ, सिंह यांना पिंजऱ्यात कैद केले, जलीय परिसंस्थेतल्या विशाल मगरींना राणीच्या बागेत आणले, गरुडासारख्या Potential Predators ला तो आपल्या खांद्यावर बसवून त्याला आपल्या हाताने अन्न खाऊ घालतो. तो नदीचा प्रवाह बदलतो, कोळश्यापासून वीजनिर्मिती करण्यापासून तर Artificial Intelligence (AI) म्हणजेच कृत्रिम बुध्दिमत्तेत यश संपादन करण्यापर्यंत त्याने सर्व साध्य केले कारण मानवी क्षमता अफाट आहेत आणि याची त्याला जाण आहे. पण माणूस प्राण्यांना अन्नासाठी नाही मारत. तो त्यांची शिकार करतो कारण तसं तो करु शकतो. माणूस बलात्कार सुध्दा करतो कारण तो तसं करु शकतो.
माझा एकच मुद्दा विचारात घ्यावा की तेव्हा जेव्हा आपण शिकार करायचो आपले मन असंवेदनशील होते पण काळाच्या ओघात आपल्यात खुप बदल झाले. आणि या उत्क्रांतीमध्ये आपण नुसतेच संवेदनशीलच नाही झालो तर आपली देहयष्टी बदलली, आपले मोठे सुळ्यासारखे दात लहान झाले. शेती करु लागलो. थोडक्यात आपण सुसंस्कृत झालो Civilized झालो.
शेवटी एवढच वाटतं की "जगा आणि जगू द्या" या साध्या सोप्या शाळेतल्या मुलांना शिकवल्या जाणाऱ्या तत्त्वावर ही सृष्टी काम करु शकते. याला बरेच अपवादही आहेत. तुम्ही म्हणाल की काही गोष्टींमध्ये मनुष्याला या सजीवांची हिंसात्मक पध्दतीने गरज ही आहेच. औषधशास्त्रात आणि वैद्यकशास्त्रात त्यांच्यावर चाचण्या करूनच मानवाचे जीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करतात. पण त्यातसुध्दा त्यांची अमानुष कत्तल नाही होत. जेवढी गरज तेवढ्याच चाचण्यांमधून त्यांना Subject बनवले जाते. इतर ठिकाणी तर त्यांना इजा न पोहचवता फक्त त्यांचे Fluid Samples काढून त्यांना पर्यावरणात पुन्हा सोडून देण्यात येते. उदाहरणार्थ, Russell's Viper सारख्या अतिविषारी सापाच्या विषापासून सर्पदंशविरोधी लस प्रयोगशाळेत तयार केली जाते. इतकेच नाही तर त्याच्या विषाचा उपयोग हा उच्च रक्तदाब, क्षयरोग, कर्करोग यांसारख्या आजारांवरच्या औषधांमध्ये केला जातो.
इतिहासात पाहिलं तर माणसाने देव बनवला आणि तो इतिहास तोपर्यंत थांबवणार नाही जोपर्यत तो स्वत: देव बनत नाही.
टिप्पण्या