Nature Always Wins

आजच्या दिवशी बरेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दिवस आहेत. परंतु आज जागतिक पर्वतारोहण दिवस देखील आहे त्यामुळे या दिवसावर काहीतरी लिहावे असे मला वाटले. कोणाला माहीत असेल की नाही हा दिवस माहीत नाही आणि कोणाला माहीत असला किंवा नसला तरी त्याने विशेष फरक पडत नाही. कारण भारतातल्या प्रत्येकाला स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन केव्हा असतो किंवा त्याचे महत्व याची जाणीव त्यांना आहे का? तर नाही. जे की माहीत असायला हवे खरेतर. पण या गोष्टींच्या माहिती होण्याने त्यांच्या जीवनात फारसा काही फरक पडत नाही असे त्यांना वाटत असेल. भारताचा पंतप्रधान कोण आहे, राष्ट्रपती कोण आहे, हेही भारतातल्या अनेक भागात अनेक लोकांना माहीत नसते. कारण आपल्या समाजातील तळागाळातील लोक मूलभूत गरजा पूर्ण करण्यात इतके पिचले जातात की देश, राष्ट्रप्रथम, संविधान, इत्यादी सर्व दुय्यम ठरते. त्यापुढे पर्वतारोहण दिवस? असे दिवस असतात का आणि असतील तर ते साजरे केले जातात हेही कोणाला माहीत असेल काय. बॉबी मॅथ्यूस आणि जॉश मॅडीगन या दोघांनी उत्तरपूर्व न्यूयॉर्क मधील आडीरोनडॅक डोंगररांगेतील सर्व ४६ शिखर सर केले. १ ऑगस्ट २०१५ रोजी या दोघांनी त्यातली ४६ वी शिखर मोहीम पूर्ण केली म्हणून १ ऑगस्ट हा जागतिक पर्वतारोहण दिवस म्हणून साजरा होतो. 

पर्वतारोहण हा साहसी छंद आहे. वेळात वेळ काढून लोक त्यांच्यातले साहस आजमावण्यासाठी पर्वतांमधून वेळ घालवत असतात. आधी इथे फक्त हौशी लोक येत जात. आणि अलिकडेच याला खेळ म्हणून पाहिले जाऊ लागले. त्यामुळे हा साहसी खेळ प्रकारात मोडला जाऊ लागला. परंतु साहसी असणे, साहस दाखवणे यासाठी हल्ली खुप लोक पुढे सरसावतात आणि अपघातात स्वत:ला अडकवतात.

पर्वतारोहण हा एक थरारक अनुभव आहे त्यांच्यासाठी ज्यांना धाडसी प्रवास करण्याची आवड आहे. आवड हा शब्द अन्याकारक ठरतो थोडा कारण निसर्गात आवड नाही दुर्दम्य इच्छाशक्ती असावी लागते. कारण निसर्ग Superior आहे, सर्वोच्च आहे. आवडी-निवडींसाठी निसर्गात फिरायला जाणारे हे लक्षात घेत नाही की निसर्गाच्या काही काळ्या छटा असतात. असो! पर्वतारोहण ही अशी कृती आहे जे तुमचे शारीरिक आरोग्य उच्च पातळीवर ठेवण्यास सहाय्य करते. पर्वतारोहण ही एक अशी क्लिष्ट कवायत आहे जी तुमच्या शरीरातील एकूण एक स्नायूंचा अंत बघेपर्यंत वापर करायला लावते ज्याचा निकाल तुमच्याच शरीराला मिळतो सुदृढ शरीराच्या रुपात. अंतिमत: ते तुमच्या मनालाही सक्षम करत असते. परंतु या गोष्टींचा विचार करुन सर्व लोक पर्वतारोहण करण्यासाठी बाहेर पडतीलच असे नाही. 

संदर्भ म्हणून जागतिक पातळीवर सुध्दा नजर फिरवू. Mountaineering, Rock Climbing यासाठी तेथील सरकारे लोकांना प्रशिक्षण पुरवतात आणि त्या गोष्टीचे पालन करुन मगच लोक पर्वतारोहण, प्रस्तरारोहण (Rock Climbing) करतात. हे करण्यासाठी जे आवश्यक साहित्य (Safety Gears) लागते ते सर्व जवळ बाळगले जाते. आपल्याकडेसुध्दा भारतात Nehru Institute Of Mountaineering (NIM), Himalayan Mountaineering Institute (HIM) National Institute Of Mountaineering and Allied Sports, Dirang (NIMAS) आणि अशा बऱ्याच सरकारी, निमसरकारी संस्था उत्तर आणि उत्तरपूर्व भारतात आहेत. तिथे जाऊन या विद्येचे प्रशिक्षण घेऊन पर्वतांचा सामना करणे त्याला आव्हान देणे योग्य पण थोडेथोडके टेकड्या डोंगर रौटाळून स्वत:ला अनुभवी समजून निसर्गाच्या सर्व Conditions मध्ये स्वत:ला झोकून देण्याचा प्रयत्न जीवघेणा ठरतो.

२०२० मध्ये गिर्यारोहक स्व. अरूण सावंत यांचा हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावरुन रॅपलिंगचे तंत्र वापरुन उतरत असताना काहीशा Unforced Error मुळे असेल किंवा निसर्गाने घात केला असेल पण त्यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. संपूर्ण ट्रेकिंग विश्व आणि गिर्यारोहकांमध्ये शोक पसरला होता आणि हे ज्या माणसासोबत झाले त्यांनी त्यांच्या ६० वर्षांच्या कारकीर्दीत यापेक्षाही अनेक आणि अवघड मोहीमा यशस्वीपणे पार पाडल्या. पण कधीही स्वत:ला निसर्गाच्या वर समजले नाही कारण रॅपलिंग करत असताना तुम्ही दोराने व्यवस्थित बांधले गेले जरी असलात तरी हे विसरुन चालत नाही की गिर्यारोहक त्यावेळेला खुप उंचावर आणि हवेत तरंगत असतो. निसर्गातील काही गोष्टी ज्या तुमच्या हातात नसतात जसे की वादळ, अतिवृष्टी, भूस्खलन, पूर या गोष्टींची कार्यकारणभावानुसार (Cause and Effect) घडण्याची क्रिया निसर्गात अविरतपणे चालू असते. एका बाजुला अरुण सावंत यांसारखा अभ्यासू गिर्यारोहकाचा इतक्या गडमोहिमांचा, अनवट घाटवाटांचा, अवघड सुळके सर करण्याचा अनुभव पाठीशी असताना ते काळाच्या पडद्याआड जातात. तर दुसरीकडे हौशी लोक या निसर्गात सहज मजा मौज म्हणून फिरायला जातात आणि स्वत:ची हानी करुन घेतात. जीवावर बेतेल अशा ठिकाणी जातात. Exploration च्या नावाखाली निसर्गाला चुकीच्या पध्दतीने हाताळले जाते. आणि मुळात निसर्गाला हाताळणारे आपण कोण?

२२ जुलैला माणगावजवळच्या ताम्हिणी-मुळशीतल्या परिसरातील कुंभे धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या २७ वर्षाच्या मुलीचा दरीत पडून झालेल्या मृत्यूची अंगावर काटा आणणारी दु:खदायक बातमी, लोणावळ्याच्या भुशी धरण परिसरातील धबधब्याच्या प्रवाहात एकाच कुटुंबातील ५ जणांच्या मृत्यूची दु:खदायक बातमी आणि अशा बऱ्याच बातम्या कानावर पडत असतात. या वारंवार घडणाऱ्या घटनांची उकल केल्यास लक्षात येते की सर्व घटनांमध्ये माणसाच्या चुकीने होणाऱ्या घटनांचे प्रमाण जास्त आहे. माणसाचे चुकीचे पाऊल, हलगर्जीपणा, वेळप्रसंगी घेतलेले चुकीचे निर्णय या सर्व गोष्टी त्यांना मृत्यूजवळ घेऊन गेल्यात. पावसाळ्यात निसर्गात फिरण्याचा मोह कोणालाच आवरत नाही कारण निसर्गाची सुंदर रुपे याच काळात अनुभवायला मिळतात पण वेळ काळ बघून जाणे म्हणजेच निसर्गाकडे प्रगल्भपणे बघणे. ना की पावसाळा सुरु झाल्यालगेच बेदरकारपणे देवकुंड, अंधारबन, ताम्हिणी, भिमाशंकर, धबधबे, तोरणाचे रस्ते शोधणे.

Right Approach : फार महत्वाचा मुद्दा आहे हा. निसर्गातून फिरताना आणि निसर्गाकडे पाहण्याचा योग्य दृष्टीकोन कसा असायला हवा हे माणसाने समजून घेणे आणि त्यासाठी एक गोष्ट कायम सर्वांनी लक्षात घ्यावी की निसर्ग Supreme आहे. सर्वोच्च आहे. Indus Valley Civilization म्हणजेच सिंधू संस्कृतीपासून लोक निसर्गाला देव म्हणून पूजत आले आहेत. अग्नि ही भारतातील प्रथम देवता. तसेच रानावनातून, डोंगरदऱ्यातून वास्तव्य करणाऱ्या आदिवासींनी वनदेवतेला पूजले. हे सर्व का तर त्यापासून त्यांचे जीवन चालते हे ते जाणून आहेत. अग्निचा शोध लागला तेव्हा अंधाऱ्या गुहेत उजेड मिळाला, अन्न शिजवता आले, मरणाच्या थंडीत शरीर उबदार ठेऊ शकले, वन्य प्राण्यांपासून स्वत:चा जीव वाचवू शकले. तसेच रानातून मिळणाऱ्या फळे, औषधी वनस्पती, लाकूड, डिंक, मध आदि गोष्टींवर आदिवासींचे जीवन अवलंबून असते. अशा निसर्गाला देव मानणाऱ्या आदिवासींची अशा निष्काळजीपणाने गेलेल्या मृत्यूंची बातमी कधी कानावर येत नाही. कारण त्यांनी त्याला देव मानले आहे आणि निसर्गाला निर्बुध्दपणे आव्हान द्यायला हे लोक जात नाही कारण ते निसर्गाला पूजतात. निसर्गापुढे ते जात नाहीत. हे अशा प्रकारचे उगाचचे धाडस शहरातल्या लोकांकडून होते कारण तो Right Approach, निसर्गाकडे पाहण्याचा योग्य दृष्टीकोन अलिकडच्यांचा चुकतो.

हल्लीच्या वाढत्या निसर्गातल्या मृत्यूंना जितके ते स्वत: जबाबदार आहेत तितकेच ते ज्या Influencers च्या चित्रफिती (Videos) पाहून जातात ते समाजमाध्यमांवरील प्रत्येक Influencers देखील जबाबदार आहेत. प्रकाशझोतात येऊन प्रसिध्दी मिळवण्याच्या नादात अवघड वाटा आणि Hidden Gem 'Explore' (धुंडाळण्याच्या) करण्याच्या नादात लोकांवर त्याचा कोणता प्रभाव पडतो आहे ते थोड्या थोड्या दिवसाने येणाऱ्या बातमीतून आपल्याला कळते. आणि उद्देश कितीही चांगला असला तरी त्याची अवनती ही जर भल्या उद्देशाला मागे सारत असेल तर त्या उद्देशाचा पुन्हा विचारही व्हायला हवा आणि नियमनही व्हायला हवे.

शिवाजी महाराजांचे किल्ले म्हणा, रौद्ररूप घेऊन कोसळणारे धबधबे म्हणा, सह्याद्रीचे उंच बेलाग कडे म्हणा ही सर्व निसर्गाची आविष्कारे आहेत. ती पाहायची असतील तर शिस्त ही महत्वाची. तिथे नवख्यांना ५०-१००-२०० च्या संख्येने घेऊन जाऊन काही पैशांसाठी त्यांचा जीव धोक्यात घालणारे Event आणि Trek वालेही खुप झालेत. अशा ठिकाणी जाऊन तुम्ही शांततेत निसर्गाचा, तेथील जैवविविधतेचा, भौगौलिक स्थानाचा अभ्यास करता की निव्वळ धिंगाणा आणि कचरा? या विषयावर माझे मत अतिरेकी वाटेलही पण अशी ठिकाणे ही या सर्व गोष्टी करण्यासाठी किंवा सहज म्हणून टेहळण्यासाठी नक्कीच नाहीत. त्यासाठी माणसानेच मनोरंजनाची ठिकाणे (रेसॉर्ट्स आदी) उभारली आहेत. शिवाय जेव्हा समाजमाध्यमांचे आणि ड्रोन कॅमेराचे प्रस्थ इतके माजले नव्हते तेव्हा हे Reverse Waterfall, Ring Waterfall, Step Waterfall अशी नावेही कोणाला माहीत नव्हती. ही सर्व नावे नंतर तिथल्या स्थानिकांनीदेखील नाही तर इथे येणाऱ्या हौश्या नवख्यांनी दिलीत. त्यांची होणारी गर्दी पाहून स्थानिक गावकऱ्यांनी त्यांना खाण्यापिण्याची दुकाने, राहण्यासाठी घरे उपलब्ध करुन दिली. एकूणच काय तर स्थानिकांना रोजगार मिळाला पण अशाच काही ठिकाणी मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले. रोजगार जातील या सबबीखाली होणाऱ्या मृत्यूंकडे दुर्लक्ष तर नाही ना करता येणार! नीट लक्ष दिले तर समाजमाध्यमांच्या येण्याआधी ही ठिकाणे कोणाला माहीतही नव्हती त्यामुळे इथे होणारे अपघात शून्य होते. मग हल्लीच का इतक्या घटना घडत आहेत? आता Hidden Gem च्या नावाने प्रसिध्द झालेली आजची चित्रफित पाहून उद्या तिथे शंभर पर्यटक गर्दी करतात. त्यातले सर्व प्रशिक्षित गिर्यारोहक किंवा भटकंती करणारे जिज्ञासू अभ्यासक देखील नसतात. त्यामुळे पूर्वी एकही बातमी नाही आणि हल्ली या बातम्यांचा बाजार होतो आणि बातम्यांच्या वाहिन्या (News Channels) देखील या स्पर्धेत Influencers प्रमाणेच मागे पडू इच्छित नाही. 

अनुभव नसलेल्या पाण्या-पावसाची, ऊन खडकाची जाण नसलेल्या लोकांची नुसती झुंबड अशा ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यांच्या अपघाताला जबाबदार ठरतात ते हे Trek, Event Arrange करणारे लोक आणि ते ही गोष्ट विसरतात की निसर्ग भेदभाव करत नाही. नदीला अचानक आलेल्या प्रवाहात तो ४ अनुभवी माणसांसोबत महिला, लहान बालके कोणालाही बघत नाही, कारण Nature Takes No Side (निसर्ग कोणाचीच बाजू घेत नाही). मग तुम्ही कितीही सुरक्षेच्या साधनांसकट लोकांना घेऊन जा, अगदी दोर का बांधेना, निसर्गाच्या प्रवाहात तो सर्वांना वाहून नेतो कारण Nature Always Wins. मानवाने उत्क्रांत झाल्यापासून, अंतराळावर स्वत:ची मक्तेदारी स्थापित केल्यापासून तो सर्वश्रेष्ठपणाचे बिरुद घेऊन मिरवू लागला आणि हे कौतुकास्पदच आहे. पण जेव्हा अविवेकी वागणे येते आणि मानवाला वाटू लागते की आपण निसर्गापुढेही सर्वोच्च आहोत तेव्हा तो तुम्हाला थांबवतो आणि सगळं उध्वस्त करायला एक क्षण देखील घेत नाही.

शेवटी मनुष्याच्या कृतीही या न त्या प्रकारे घातक ठरतात. कोल्हापूरमध्ये झालेला पूराचा हाहाकार हा वरुन पडणाऱ्या पावसाने कमी आणि पंचगंगेच्या नदीच्या बंद दरवाज्याने जास्त झाला. धरणाचे दरवाजे उघडले तर खालची कर्नाटकातील गावे जाणार आणि बंद ठेवले तर वरचे कोल्हापूर. इथे फक्त कमी नुकसान हाच उपाय निवडला गेला.

त्यामुळे नदी, धरणे, पाऊस, धबधबे, गडकिल्ले अगदी कडाक्याचे ऊन देखील यांना कमी लेखून (Underestimate) चालणार नाही. कायम धाडसी बनणे, साहस दाखवणे योग्य नाही. या निसर्गशक्ती आहेत आणि त्याचा आदर मनुष्याने राखला पाहिजे. सहज म्हणून फिरायला गेलेल्या कमी धोक्याच्या ठिकाणी सुध्दा आपला हलगर्जीपणा आपल्यावर धोका आणू शकतो. म्हणून Right Approach महत्वाचा.


Nature Always Wins

By Mayur SP Nisarad



टिप्पण्या

अनामित म्हणाले…
वास्तवदर्शी लेखन
Ketan K. म्हणाले…
अगदी बरोबर, निसर्ग सर्वोश्रेष्ठ आहे!
Mayur SP Nisarad म्हणाले…
धन्यवाद प्रथमेश