Gorakhgad and Siddhagad Trek


गोष्ट २०१६ ची. ऐन डिसेंबरच्या थंडीत पश्चिम घाटामधल्या भिमाशंकर डोंगररांगेतील आहुपे घाटाचा संरक्षक असलेले गोरखगड आणि सिद्धगड हे दोन अवघड श्रेणीचे किल्ले सलग दोन दिवसात करायचे ठरवून मस्तानी (माझी बाईक) घेऊन मी आणि माझा मित्र स्वप्नेश खाडे आम्ही दोघेच निघालो. पहिल्या दिवशी गोरखगड किल्ला आमचा यशस्वी करुन मुरबाडला आमचे दाजी निलेश आंबवणे यांच्या गावी त्यांचे भाऊ गिरीश आंबवणे यांच्याकडे मुक्कामाला यायचं होतं. पण पेट्रोलचा अंदाज न आल्याने गाडी रीझर्व्हवर लागली. मधला रस्ता सामसूम होता आणि एवढ्या रात्री जाणे जिकीरीचे होते. त्यामुळे शिल्लक पेट्रोलमध्ये जाणे होणार नाही, तेव्हा गोरखगडाच्या पायथ्याच्या गावात राहात असलेल्या फरहान जुवारी या आमच्यापेक्षा काही वर्षे लहान असलेल्या मुलाने आमच्याकडे पुरेसे पैशे नसतानाही आम्हाला पेट्रोल देऊ केले. जे पैशे होते ते रस्त्यात काही अडचण निर्माण झाली तर तुमच्याकडे असलेले बरे या उद्देशाने त्याने पैशे घेतलेच नाही. त्याच्यामुळे आम्ही परत जाऊ शकलो. दुसऱ्या दिवशी सिद्धगड करायला आलो तेव्हा त्याला ATM मधून काढून आणलेले पैशे दिले व आभार मानले. एक अवघड किल्ला करुन आलेलो असतानाही उसंत न घेता दुसऱ्या दिवशी ट्रेकर्स लोकांची परीक्षा घेणारा सिद्धगड करायला निघालो आणि इथून गोष्टी बदलू लागतात..

डावीकडे मच्थिंद्रगड आणि उजवीकडे गोरखगड किल्ला

स्वप्नेश, फरहान आणि मी

दुसऱ्या दिवशी सकाळी निघायला थोडा उशीर झाला कारण आदल्या दिवशीच्या गोरखगडाच्या रात्रीने झोप झाली नव्हती आणि त्यामळेच पुढच्या अनपेक्षित गोष्टी घडत गेल्या. नारीवली मार्गे सिद्धगड किल्ल्याकडे जाताना एक सुकलेला झरा लागतो. ज्याचा प्रवाह पुढे जाऊन बारवी धरणाला मिळतो. तो झरा ओलांडून मळलेल्या पायवाटेने पुढे जाताना जंगलातून आत शिरुन एका टेकाडावर आलो आणि कळलं की वाट चुकलो आम्ही कारण ती वाट आहुपे घाटाची होती. मग खाली उतरुन एका झापावर असलेल्या आजोबांनी मार्ग दाखवला आणि त्या वाटेने चढण करु लागलो तेव्हा योग्य वाटेवर आलो. सुकलेल्या झरे आणि धबधब्याच्या मार्गाने जाताना खाचखळग्यांमध्ये थोडे पाणी होते आणि पुढे थोडा वाहता पाण्याचा प्रवाह दिसला. सततची त्या घनदाट जंगलातली खडी चढाई करुन थकलो होतो म्हणून तिथे बसून थोडा विसावा घेतला. तोंडावर पाणी मारुन पुन्हा ट्रेक चालू केला आणि ४ तासांच्या पायपीटीनंतर फक्त सिद्धगड माचीवर येऊन ठेपलो. तिथून दमलेल्या अवस्थेत आणखी दीड तास खडी घसरणीची अवघड चढण करुन अखेर आम्ही गडाच्या बालेकिल्ल्यावर ६ तासात पोचलो. आणि इथून भीतीची शृंखला चालू होते. कारण आमच्या समोर सूर्य अस्तास जात होता. आणि आम्हाला एका टॉर्चच्या आधारावर माघारी परतायचे होते. मोबाईलची बॅटरीसुध्दा फोटोज काढून कमी झाली होती. अर्ध्या तासात किल्ला पटापट उरकून घेतला. किल्ल्यावरुन सूर्यास्ताच्या लाल नारंगी रंगात दूर समोरचा भिमाशंकर पर्वत आणि पदरगड खुप सुंदर दिसत होता. भटकंतीला इतका वेळ लागेल असं वाटलं नव्हतं त्यामुळे सोबत खायलासुध्दा जास्त काही आणलं नव्हतं. प्रचंड भूक लागली होती. बिस्कीटे वगैरे खाऊन संपली होती आणि पुढे आणखी ३-४ तास त्या भयाण जंगलातून अंधारातून जात उतरायचे होते. त्यामुळे आम्ही त्या गावातच कोणाकडे काही खायला मिळतंय का ते पाहू लागलो.

दोन डोंगरांच्या मधून जाणारी आहूपे घाटाची वाट

सिध्दगड किल्ल्याचे माचीवर असणारे घनदाट झाडीत लपलेले प्रवेशद्वार

भगवान चिले लिखित गडकोट पुस्तकाच्या आधारे किल्ल्याचा शास्त्रशुध्द पद्धतीने अभ्यास करण्याचा केलेला प्रयत्न


डावीकडून वर गेलेली बालेकिल्ल्याकडे जाणारी वाट

घसरण असलेली अवघड वाट

किल्ल्याच्या माचीवर असणारे सिध्दगड गाव

गडाच्या बालेकिल्ल्यावरुन दिसणारी भिमाशंकर पर्वतरांग आणि पदरगड 

बालेकिल्ल्यावरील नंदी आणि शिवलिंग

गडाच्या शिखरावरुन अर्थात बालेकिल्ल्यावरुन दिसणारा परिसर

गडाचा बालेकिल्ला

बालेकिल्ल्यावर येण्यासाठीचे प्रवेशद्वार 

शिखरावरुन दिसणारा संपूर्ण कोकण परिसर, गोरखगड, पुढे धुरक्यात हरवलेला कसारा

एका बाईने सकाळचा उरलेला भात आणि सुकी भाजी दिली. खुप दमलो होतो त्यामुळे ते शिळे जेवणसुध्दा गोड लागत होते. अंगात थोडी उर्जा आली आणि निघालो. पण थोडच पूढे गेलो असू आणि त्या अंधारात आमची टॉर्च लप लप करु लागली. म्हणजे ती सुध्दा कधीही दगा देऊ शकत होती. आता त्या घनदाट काळोख्या जंगलातून आधीच निशाचर प्राण्या पक्षांचे आवाज येत होते, त्या हरीश्चंद्रगड आणि भिमाशंकर अशा दोन अभयारण्याच्या मधे आम्ही होतो, जिथे बिबट्यांचा आणि रानडुक्करांचा सुध्दा वावर आहे. तिथून जाणे हे मोठे आव्हान म्हणण्यापेक्षा एक जोखीम होती. जी आम्ही दोघांनी एकमताने फेटाळली. तिथे दोघांनी घेतलेला तो सुज्ञ निर्णय कोणत्याही काळी योग्यच वाटतो. तिथल्या गावकऱ्यांनी आम्हाला ती रात्र गावातच मुक्काम करण्याचा आग्रह केला. आयुष्यात पहिल्यांदा घरी काहीही न कळवता आम्ही त्या १५-२० घरांची वस्ती असलेल्या सिद्धगडमाची या आदिवासी गावात अनपेक्षित मुक्काम केला. रात्रीचे जेवणसुध्दा तिथेच जेवलो. जेवण झाल्यावर आम्ही त्या गावात रात्रीचे बिनचंद्राचे पडलेले असंख्य चांदणे पाहत होतो. ते दृश्य शहरात तर पाहायला मिळत नाहीच पण गावीसुध्दा हल्ली रात्रीच्या दिव्यांचा उजेड खुप झाल्याने त्या प्रकाशात काळोखाचे हे सौंदर्य पाहायला नाही मिळत. तिथल्या एका झोपडीत आम्ही गेलो. तिथे एक आज्जीबाई अंधाऱ्या घरात फक्त एका दिव्याच्या आधारे राहत होती. तिच्यापाशी बसून तिच्याशी बोलू लागलो तिचं ऐकू लागलो आणि माझं मन हळवं झालं. तिने सांगितलेली तिची कहाणी अजुनही माझ्या लक्षात आहे. डोंगरदऱ्यात राहणाऱ्या या आदिवासींबद्दल खुप कळवळा वाटतो.

गावातल्या त्या लोकांनी आम्हाला त्यांच्या पडवीत राहायला जागा दिली. खाली आंथरायला आणि वर पांघरायला गोधडी दिली. पण रात्रभर त्या पडवीत असलेल्या बकऱ्या आणि कोंबड्यांच्या आवाजाने रात्रभर झोप नाही लागली. पण झोपताना दिवसभरात चुकलेल्या वाटा, त्यामुळे झालेला त्रास, किल्ल्यावर पाहिलेला सूर्यास्त आणि परतत असताना पाहिलेले भयाण जंगल आणि आमच्या मनातील या सगळ्यांना सामोरे जात असताना चालू असलेली धाकधूक हे सर्व आठवत होतं. सलग दोन किल्ले मागे न हटता हट्टाने केल्याचा आनंदही आहेच आणि त्या आज्जीची मनात छापली गेलेली प्रतिमा. शिवाय अनोळखी माणसांच्या घरी बिनधास्त अथवा सावध आश्रयाला राहणे मनात घर करुन राहते. पुढच्या सकाळी त्यांच्या घरी चहा पिऊन त्यांचे आभार मानून निघालो. खाली उतरल्यावर मागे वळून पाहिलं तेव्हा सूर्योदयात सिद्धगड न्हाऊन निघाला होता. जाताना अंगावर अनुभवाची रकसॅक घेऊन दोघे परतीच्या दिशेने निघालो.

सुकलेला झरा, सिध्दगड माची आणि वर अवघड सिध्दगड

ब्लॉग वाचल्याबद्दल धन्यवाद. एक विनंती सर्वांना, निसर्गात आल्यावर कचरा करु नका, निसर्गाची काळजी घ्या. तो आहे तर आपण आहे आणि बाकी सर्व सजीवसृष्टी. लेख आवडल्यास (अथवा नाही जरी आवडल्यास) तुमची प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नोदवा.

टिप्पण्या

Pallavi म्हणाले…
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
Pallavi म्हणाले…
फार सुंदर लेख आहे.. धन्यवाद! तुमच्या या लेखातून आम्हीसुद्धा तुमच्या या प्रत्यक्ष अविस्मरणीय प्रवासाचा भाग झालो आहोत असे वाटत आहे 😊
Ketan K. म्हणाले…
उत्कृष्ट लेखन. लेख वाचताना आपण स्वतः तो संपूर्ण प्रवास लेखकासोबत केल्याचा भास होतो!
Mayur SP Nisarad म्हणाले…
अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद पल्लवी मॅडम🙂
Mayur SP Nisarad म्हणाले…
असेच प्रतिक्रिया कळवत राहा.. तुमच्या अभिप्राय देण्याने आम्हाला आणखी लिहिण्यासाठी प्रेरणा मिळते.
Mayur SP Nisarad म्हणाले…
धन्यवाद केतन कांबळी 😁 वेळात वेळ काढून लेख वाचल्याबद्दल. प्रतिक्रिया कळवत राहा.