दि. ०१ ऑगस्ट २०२०
सौरभप्रमाणे मला माझं बालपण किती आठवतं हे माहीत नाही आणि आठवत असलं तरी त्याला मी इतकं महत्व कधी दिलं नाही. त्याच्या लेखातल्या Escalator प्रमाणे माझ्या आयुष्यातही बरेच Escalator येऊन गेले पण त्यामुळे लहानपणीच्या आठवणींचा फ्लॅशबॅक कधी डोळ्यांसमोरुन गेला नाही, पण त्याचा हा लेख वाचत असतानाच मला तो फ्लॅशबॅक जाणवत होता. लेख वाचता वाचता त्यातली मैत्रीण आपली वाटू लागते आणि तिच्या प्रेमातही पडू लागतो. अर्थात याचे श्रेय लेखकाला जाते. त्याचं लिखाण इतकं ज्वलंत वाटत जातं की वाचकाला ते अनुभव आपले स्वत:चे वाटू लागतात आणि तसे ते वाटले तर लेखक यशस्वी होतो. त्याचं त्या माॅल मध्ये जाणं, तिथे आसपासच्या गोष्टींकडे पाहून त्याला त्याचं बालपण आठवणं आणि इतकं सगळं लिहूनही कुठेही माॅलचं किंवा आणखी काही नावं नमूद न करणं ही जमेची बाजू कारण त्यामुळेच ते घटनाप्रसंग वाचक स्वत:चे समजू लागतो.
मला जितकं आठवतं त्याप्रमाणे माझा सगळ्यात पहिला, जुना, आणि अगदी सख्खा पक्का मित्र कर्ण. महाभारतात आहे तोच हा. पण त्याला सगळे Karan अशीच हाक मारायचे. त्याच्या मैत्रीचा तेव्हा आणि आत्ताही खुप अभिमान आहे. शाळेतून सुटलो की घरी आल्यावर आधी त्याला शोधायचो आणि खेळायला सुटायचो. जो Seasonal खेळ चालू असेल तोच आमचाही असायचा. कॅरम, सुतळी भोवरा, नवा व्यापार, पतंग, गोट्या, बॅट-बाॅल.. इतकच काय, काही नसलं तर टि.व्ही.सुद्धा आम्ही एकत्र माझ्याच घरी पाहायचो. Seasonal म्हणजे तो खेळ संपूर्ण चाळीत सर्व मुले ठराविक महिन्यात खेळायचे. उन्हाळ्यात कोणाच्या एकाच्या घरातच बैठे खेळ आणि हिवाळा असला की बाहेर, मग कधी चाळीतच तर कधी मैदानावर. पावसाळ्यात मात्र शाळेचा गृहपाठ आणि अभ्यास करण्यावाचून पर्याय नसायचा. कारण नवीन इयत्ता नवीन वर्ग नवीन अभ्यास. पण सण उत्सवांची आणि शाळेच्या सुट्ट्यांची कॅलेंडरमध्ये जी लाल रांग लागायची त्यामुळे आम्ही खुप जोशात असायचो.
दिवस सरत गेले, मोठे होत गेलो तसं पारंपरिक खेळांमध्ये मन रमेना. लहान होतो तेव्हा बाॅल कोणाच्या घरात गेला तरी तो आपुलकीने परत मिळायचा पण नंतर मात्र ओरडा बसू लागला. बाॅल परत मिळणं बंद झालं. शाॅट जोरदार लागायचे ना. मैदानात जावं तर एकाच मैदानावर अगदी बाजुबाजुला दहा पीच करुन २० टिम खेळत असायच्या आणि त्याही आमच्यापेक्षा दुप्पट तिप्पट वयाच्या. कोण कोणाच्या टिममध्ये आहे काहीच कळायचं नाही. आमच्या वयाची पोरं कुठेतरी कोपऱ्यात जागा मिळाली तर खेळायचे. पण कोपराच तो. त्यामुळे शाॅट मारायला एकच दिशा असायची. पिचवर खेळणाऱ्यांना मात्र चौफेर मैदान. पण अशा ठिकाणी खेळण्याचा एक भारी तोटा जो माझ्या डोक्यावर दोन वेळा बसला. बाॅलिंग करत असताना माझ्यावरच कोणीतरी बाॅलिंग केली. मस्त रनअप घेऊन बाॅल टाकणार तेवढ्यात टेनिस बाॅल जोरात येऊन डोक्यावर आदळला. मागे वळून पाहतो तर सगळे तेंडूलकर. प्रत्येकाच्या हातात बॅट. शिवाय एकाच वेळी अनेक बाॅल सिक्स फोरच्या नावे हवेत उडत असायचेच. त्यामुळे खरा तेंडूलकर नाही गवसायचा. एकदा फिल्डींग करतानासुद्धा त्याच दिवशी बाॅल लागला. त्यानंतर मैदानात जाणं बंद झालं. घरात किंवा चाळीतच काहीतरी खेळत बसायचो. पण तेच तेच खेळून आता कंटाळा आला होता.
शाळेला सुट्ट्या लागल्या की खुप वैताग यायला लागला. कारण आता करायला काहीच नसायचं. बराच वेळ तर सगळे फक्त चर्चा करण्यासाठी जमायचे. चर्चा हीच की काय खेळायचं, काय करायचं, काहीतरी सुचवा, बोला काहीतरी. आता तर सुट्टी पण नको वाटू लागली. त्यादरम्यान आम्हाला बाहेरचं आयुष्य खुणावू लागलं. घराच्या बाहेर कुठेही जायचं असेल तरी आम्ही एकत्रच जायचो. त्यादिवशीही मी आणि Karan पहिल्यांदाच घराबाहेर पडलो. मस्त नवीन कपडे घालून, पावडर लावून, सेंट मारुन तयार होऊन निघालो. माॅलच्या प्रवेशाजवळ येताच मस्त असा वास येऊ लागला. तो वासच मला आत बोलवत होता. तो वास आतमध्ये असलेल्या पाॅपकाॅर्नच्या दुकानातून येत होता हे सुद्धा मला नंतर बऱ्याच वर्षांनी कळलं. माॅलच्या प्रवेशातून आत जाताना AC च्या हवेने डोक्यावरचे केस मस्त उडायचे तेव्हा इतकं सुखावून जायचं कि तिथून लवकर पुढे सरकायचोच नाही. आत गेल्यावर दिसायचा तो भव्य माॅल. सगळीकडे झगमगाट, वेगवेगळे छान सुगंध, काचेची लिफ्ट, सरकते जिने, मोठी दुकाने, सामान नेण्यासाठी ट्राॅल्या आणि संपूर्ण माॅलमध्ये थंड वातावरण. युरोप-अमेरिकेत आल्यासारखं वाटायचं. ते तिथलं वातावरण इतकं भावलं होतं की रोज तिकडे जाऊ लागलो. वस्तू खरेदी करायचो नाही पण तिथल्या वस्तू फक्त बघण्यातही मजा वाटायची. शिवाय एवढे लहान होतो की खिशात पैशे काहीच नसायचे पण उगाच शर्ट पॅन्टच्या किंमती बघत बसायचो. सगळ्यात आवडीची जागा म्हणजे टाॅय सेक्शन. तिथे गेलो की लवकर बाहेर यायचोच नाही. इतकी खेळणी इतक्या जवळून कधीच पाहिली नव्हती. दुकानात असं पाहून देत नाही, जे हवं ते मागायचं मग तेच दुकानदार काढून देतो पण इथे इतकी खेळणी आणि कोणी विचारायला नाही त्यामुळे सगळी खेळणी हातात घेऊन पाहायचो, किंमती बघायचो आणि पैशे साचवून पुढच्या महिन्यात घेऊ म्हणून कुठेतरी इतर खेळण्यांमागे दिसणार नाही अशाप्रकारे लपवून ठेवायचो आणि पुढच्या दिवशी येऊन ते खेळणं विकलं गेलं तर नाही ना, कोणाला सापडलं तर नाही ना हे बघायचो. G.I.Joe, Military, Hotwheels game, Beyblade, Transformers ही माझी सगळ्यात आवडीची खेळणी. रोज माॅलमध्ये येऊन खेळणी बघण्यात पण आनंद वाटायचा.
माॅलच्या टाॅप फ्लोरवर गेमिंग झोन होतं. ही जागा तर इतकी उर्जितीवस्थेत असते की इथे आल्यावर नेहमीच मस्त वाटायचं. खासकरुन रात्रीच्या वेळी खुप गजबज असायची तिथे. तिथल्या मूडला अनुसरुन जोरात गाणी वाजायची. वेगवेगळ्याप्रकारचे गेम्स असायचे. मोठ्या स्क्रीनसमोर बसून कार, बाईक चालवणे, बास्केटबाॅल, मोठ्या चिमट्याने काचेत ठेवलेल्या वस्तू उचलणे असे अनेक गेम्स. आम्ही दोघे गेल्यावर बाजूबाजूच्या कारमध्ये किंवा बाईक वर बसून समोर स्क्रीनवर चाललेल्या चित्राकडे बघत गाडी चालवायचो. पैशे न टाकता नुसतंच स्टेरींग व्हील फिरवायचो. त्यातसुद्धा मजा यायची. नाही असं नाही. दुसरे खेळत असलेल्या गेमकडे बघत उभं राहाण्यातही आनंदच होता. मी त्याच्या जागी खेळत असतो तर आऊट झालोच नसतो, जिंकलो असतो असं मनात म्हणायचो. पण हे सगळं खुप महाग. पण एकदा पैशे जमा करुन गेलोच पण काहीच गेम खेळू शकलो. गेम जिंकल्यावर मशिनमधून टिकीट मिळायचे ती पण एक गंमत असायची. जितके जास्त टिकीट तेवढं मोठं गिफ्ट. म्हणून कोणताही गेम खेळताना मी आणि Karan दोघे एकत्रच खेळायचो. बास्केटबाॅल खेळताना त्या बास्केटमध्ये आम्ही दोघे एकत्र एकापाठोपाठ एक बाॅल टाकत जायचो. साधारण १० ते १५ बॉल तिथे असायचे. पण एवढं करुनही मनासारखं गिफ्ट काही मिळालं नाही. मिळालं ते फक्त पेन्सिल, खोडरबर आणि पट्टी.
एक दिवशी सहज म्हणून दुसऱ्या मॉलमध्ये फिरायला गेलो. तो यापेक्षाही मोठा होता. पण इथे वेगळं म्हणजे Bowling alley आणि Crossword होतं. Bowling करण्याचं स्वप्न अजुन पूर्ण नाही केलंय पण त्यादिवशी Crossword मध्ये गेलो तो पहिला दिवस मला अजुनही आठवतो. राहूल नावाचा माझा मित्र, त्याने मला ती जागा दाखवली. एवढी पुस्तके मी कुठेच पाहिली नव्हती. तिथली पुस्तके फक्त वाचण्यासही उपलबध होती त्यामुळे मला ती जागा जास्तच आवडली. बसायला कुशन सोफा आणि खुर्ची, काहीजण तर खाली बसूनच पुस्तक वाचत होते, लहान मोठे सारेच. पण मराठी पुस्तके फारच कमी, होती ती सर्व इंग्रजीच. आणि तेव्हा वाचण्याइतपतच इंग्रजीशी संबध होता. मग ज्यात रंगीत चित्र असायची अशी पुस्तके घेऊन बसायचो. त्यातपण Human Body Facts किंवा मग गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड अशी पुस्तकं काढून वाचत बसायचो. तिथल्या दोन गोष्टी ज्या मला खुपच आवडल्या त्या म्हणजे शांत संगीत बाजूला लावून दिलेलं असायचं आणि दुसरं म्हणजे एका मोठ्या बाऊल मध्ये काही फुलं असायची, कृत्रिमच असावीत बहुधा पण त्या फुलांवर एका कुपीतून सुंगधी द्रव्य ओतलं की तासनतास तो सुगंध दरवळायचा. अशा वातावरणात पुस्तक वाचायला तर छान वाटेलच पण झोपसुध्दा छानच लागेल.
मॉलमध्ये फिरताना एकदा Escalator ने वर जात असताना काही मित्रमैत्रिणींचा घोळका दिसला. त्यातली एक मुलगी फार सुंदर होती, मिनी स्कर्ट घातलेली, केसांचे वळणही सुंदर होतं. ती दुसऱ्या Escalator ने समोरुन खाली येत होती तेव्हा तिने लावलेल्या महागड्या पर्फ्यूमचा तो सुंगध सगळंच कसं शांत करुन गेला. सगळी गजबज माॅलमधली त्या क्षणापुरता थांबली होती. तेव्हा मला पहिल्यांदा वाटलं की मला मैत्रिण आहेच नाही. ती काय असते कशी असते काही अनुभवच नाही. आज जेव्हा सौरभचा लेख वाचला तेव्हा तो माझ्यासाठी Escalator ठरला. त्या Escalator ने मी मागे तर जाऊ शकत नाही पण पाहू शकतोय. जर जायला मिळालंच तर पुन्हा Karan लाच भेटेल, अगदी आवर्जुन. पण एकाच नदीत आपण पुन्हा जाऊ शकत नाही. कारण नदीही तिच नसते आणि आपणही.
टिप्पण्या