दिनांक : २७ मार्च २०२०
पहाटे ५:२० ला जाग आली. तशी सवयच लाऊन घेतलेय सूर्याला हरवण्याची त्यामुळे हल्ली मोबाईलचा गजर न लावता आपोआपच जाग येते. सरकारने अत्यावश्यक सेवांसाठीच आणि कामासाठीच बाहेर पडता येईल असे सांगितल्याने दुध आणायला आता मीच जातो. घरापासून दहा पावलांवर दुध मिळत असूनही मुद्दाम १ कि.मी. पहाटेच्या काळोखात चालत जाऊन दुध आणतो. त्यामुळे नियम मोडल्याच्या व्याख्येत मी येत नाही आणि दिवसभर घरातच बसून असतो त्यामुळे दुधाच्या निमित्ताने घराबाहेर निघण्याची संधी मिळते. तर इथून सुरुवात होते या कोरोना काळात माझा दिवसभरातला वेळ यथायोग्य घालवण्याची. अर्थात वेळ घालवत मी नाहीच कारण त्याचा होईल तितका उपयोगच करुन घेतो.
तर अशाप्रकारे सुपर अर्ली माॅर्निंग वाॅकला जाऊन आलो की लोकसत्ता वाचायला घेतो. संपादकीय वाचल्याशिवाय वृत्तपत्र वाचले गेले असे मला अजिबात वाटत नाही. अंघोळ करुन एक तास प्राचीन भारताचा इतिहास वाचून होतो तरी सूर्य काही 'ड' जीवनसत्व वाटायला बाहेर पडत नाही. तोही आता आरामातच उगवत असेल म्हणा आणि उगवलाच तरी घराच्या दारं खिडक्यांचं तोंड उत्तरेकडे असल्याने त्याला बघायला घराबाहेरच जावे लागते, जे शक्य करत नाही मी.
या कोरोनाच्या दिवसात लोक सुट्टीलाही कंटाळलेत. सुट्टी आराम यातले काहीच मिळत नाही म्हणून त्रासलेले आता भरमसाठ सुट्टी मिळाली म्हणून कंटाळून चहाच्या गाळणीचे छिद्रे मोजू लागले, कोणी दुपारच्या भातात आई किती तांदळाचे दाणे घालते हे मोजून डाळीत किती हे उद्या मोजून सांगतो असे म्हणू लागले. उद्या सलून बंद आहे म्हणून स्वत:च डोक्यावर ट्रिमर फिरवून घरभर केस पांगवून ते मोजून दाखवले तर काही नवीन शोधले असेच म्हणावे लागेल. इतके वैतागून किंवा असंयमी होऊन चालणार नाही. एम्.पी.एस्.सी. चा शिक्षणार्थी या नात्याने आमच्या जमातींना ही संधीच असते. त्यामुळे दिवसभराच्या उन्हाट शांततेत अभ्यासाच्या डोंगरांचे अनेक ट्रेक दर दिवशी न थकता पार पाडतो. पण ट्रेक असो वा अभ्यास, कंटाळा येतोच. म्हणून मग काही छंद जोपासलेले असतात त्यात अक्षरश: खोल शिरतो. खोल का.. ते कळेल.
कुठलीही गोष्ट अनियंत्रितरित्या मनात आणायची ज्याबद्दल शून्य माहिती आहे मग तिचा शोध घ्यायचा. उदा., गाडीत पेट्रोल टाकल्यावर नेमके असे काय होते की ती चालू लागते? बरं मग दुचाकीत पेट्रोलच का भरतात? डिझेल का नाही? दोघांतील फरक काय? ते कसे तयार केले जातात? ऑक्टेन नंबर काय असतो? मग अचानक माहिती मिळवता मिळवता लक्षात येते की ६५ डाॅलर प्रति बॅरल हा कच्च्या तेलाचा भाव उतरुन आता २६ डाॅलर/बॅरल झाला आहे. इथपर्यंतची उत्तरे मिळाली की मग पुन्हा टु स्ट्रोक इंजिन आणि फोर स्ट्रोक इंजिनमधला फरक? बी.एस्. ४ आणि बी.एस्. ६ यांमधला इंजिन डिफरन्स काय? थोडक्यात काय तर गाडीत इंधन भरल्यापासून ते धुरांड्यातून धूर बाहेर निघेपर्यंत आपल्या गाडीच्या इंजिनमध्ये काय काय होत आहे याचे ज्ञान करवून घेणे. तेव्हा मग आर्ट्स च्या विद्यार्थ्याला ऑटोमोबाईल इंजिनिअरींगमध्ये शिरावे लागते आणि बऱ्याच कुतुहलात्मक गोष्टी पाहायला मिळतात. जसे की पेट्रोल इंजिनमध्ये एअर फ्यूल मिक्शर सोबत स्पार्कप्लगच्या सहाय्याने निळी ज्वाला पेटते तर डिझेल इंजिनमध्ये नारंगी ज्वाला पेट घेते. आपण जेव्हा कोणतेही वाहन चालवत असतो तेव्हा इंधनाचे ज्वलन होत असते हे माहीत असते पण आपल्याला कल्पनाही नसते की त्या वाहनाच्या इंजिमनध्ये काही सेकंदापुरता असे लक्ष कोटी वेळा आगीचा अक्षरश: भडका होत असतो. या सगळ्या गोष्टी युट्युबवर पाहून कोणालाही लगेच समजतील. ते झाले की महेश काळे या प्रिय गायकाचे संगीत ऐकणे व त्याच्या ऑनलाईन शिकवणीतून शास्त्रीय संगीत थोडे शिकण्या समजण्याचा प्रयत्नही करणे. शास्त्रीय संगीतात 'राग' फार महत्वाचे असतात आणि त्याचे खुप प्रकार आहेत. पैकी मालकंस आणि यमन राग माझे विशेष आवडीचे. त्यांच्या गायनाच्या विशिष्ट वेळाही ठरलेल्या असतात. हे सगळं खोलात जाऊन यासाठी कारण माझे असे स्पष्ट मत आहे की कोणतीही गोष्ट प्रत्येकवेळी नुसतीच करमणूक म्हणून करण्यापेक्षा तिच्या असण्यामागची कहाणी व तिचे मूलभूत शास्त्र जाणून उमजून घेतले की तिचा आदर केला गेला असे मी समजतो. म्हणजे आपण जे वाहन चालवतो ते नुसतेच न चालवता त्याचे इंजिन कसे काम करते याचा कुतुहलाने कधीतरी नीट बसून अभ्यास केला तर त्या वाहन बनवणाऱ्या शास्त्रज्ञाला व त्याच्या आविष्काराला सन्मान दिला जातोय असे वाटेल. कारण त्या शास्त्रज्ञाची खुप वर्षाची मेहनत आहे म्हणून आपण ते यंत्र वापरत असतो.
वेळ पटापट जावा म्हणून दुपारची झोप सुध्दा घेऊ लागलो पण नंतर मला ते पटेना म्हणून बंद केले. त्यापेक्षा स्वत:च्या आयुष्याशी जुळेल अशी कविता इंटरनेटवर शोधायची, अनेक सापडतात. माझ्यासाठी नेहमी ग्रेसच्या कविता असतात. दिवसातून काही वेळ नुसताच (अर्थपूर्ण) विचार करत बसण्यातही मजा असते. कोरोनाबद्दल बोलायचे झाल्यास विचार येतो की इतकी भीषण वेळ आलीच कशी? आपत्ती कदाचित टाळू शकलो नसतो पण त्याचा आघात आणि हानी नक्कीच कमी करु शकलो असतो. एक पेशी म्हणजे तुम्ही जिवंत आहात, दोन पेशी म्हणजे तुम्ही चालताय. कोणतीही पेशी किंवा जीव आपल्या सभोवतालचे वातावरण हे जगण्यालायक आहे असे त्याला वाटत नाही तोपर्यंत तो पुढे नवी पेशी निर्माण करत नाही आणि जेव्हा त्याला वाटते की वातावरण सभोवतालची परिस्थिती जगण्यालायक आहे तेव्हा तो नव्या पेशीला जन्म देऊन माहितीही पुढे संक्रमित करतो. मग त्या पेशी किंवा जीव सारख्याच आनुवंशिक पद्धतीने पुढे आणखी जीवांचे पुनरुत्पादन करीत राहतात. प्रश्न असा पडतो की या जगात कोरोनासारख्या विषाणूने २७ हजारपेक्षा जास्त जणांचा जीव घेतला असताना (हा लेख लिहून संपेपर्यंत बळींची संख्या दुर्दैवाने वाढलेली असेल आणि ती वाढतेच आहे) आणि ६ लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण सध्या संपूर्ण जगात असताना (जी अनेक देशांची फक्त लोकसंख्या आहे), दरवर्षी होणाऱ्या वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीत (मी त्याला मानवनिर्मितच म्हणेण) हजारो मृत्यू होत असताना, दरवर्षी हजारो मुलींवर बलात्कार होत असताना, त्यांना पळवून नेऊन त्यांचा विक्रय व्यापार होत असताना, एकीकडे दहशतवादी बाॅम्बस्फोट होत असताना, मिटिओरोलाॅजिकल डिपार्टमेंटकडून हवेची गुणवत्ता सतत आणि सतत 'धोकादायक' दाखवत असताना आणि काही पशुपक्ष्यांच्या प्रजाती या पृथ्वीतळावरुन पूर्णपणे नष्ट झालेल्या असताना व काही नष्ट होण्याच्या मार्गावर असताना खरेच तुम्हाला असे वाटते का की सध्याचे वातावरण पुढे प्रजोत्पादन करण्यास अनुकूल आहे? नवीन जीव या पृथ्वीतलावर निर्माण करण्यास ही परिस्थिती अनुकूल आहे? आपला बाप राजा शुध्दोधन नाही नि आपण सिद्धार्थ नाही की आपल्या सभोवताली सुवर्णभिंतींची तटबंदी उभारुन आपल्याला सुखी सुरक्षित ठेवेल. आपण अशा समाजात राहतो जिथे लोकांना त्यांचे हक्क माहीत आहेत पण कर्तव्यपालन माहीत नाही. वेळीच आत्मपरीक्षण झाले नाही तर आयुष्यातूनच महाभिनिष्क्रमण करावे लागेल. जितकी लोकसंख्या वाढत जाणार तितकाच बेशिस्तपणा आणि तितकीच हिंसा सुध्दा वाढतच जाणार आहे. शिरवाडकरांच्या बेलवलकरांचं एक मोनोलाॅग आहे.. "नर्कातले सूक्ष्मदेही किटकही मैथून करतात किटकींशी आणि किटकांची जमात वाढवून मरुन जातात किटकांसारखे.."
कधीतरी प्राचीन, मध्ययुगीन इतिहासातून देव आणि देवादी संकल्पनांच्या उदयावर आणि धर्मांची उत्पत्ती व त्यांच्या आवश्यकतेवर विचार करणे यांसारख्या अनेक गोष्टींवर माहिती मिळवून त्यावर विवेकी विचार करुन सद्सद्विवेकबुध्दीची धार तीक्ष्ण करण्यात वेळ कसा सत्कर्मी लागतो हे कळतच नाही.
अच्युत गोडबोलंचं 'अनर्थ' हे नवे पुस्तक सध्याच्या वातावरणात मिळू शकणार नाही म्हणून त्यांचेच माझ्या ठेवणीतील पाश्चात्य साहित्यावरील 'झपूर्झा' हे फार सुंदर पुस्तक वाचतोय.
या दिवसांत नेहमीसारखे मित्रांना फोन करणे, गाणी, चित्रपट हे न करता स्वत्वाचा शोध घेण्याचा, पुन्हा बुध्दांच्या विपश्यणेकडे जाण्याचा, संगीताचा शास्त्रीय अभ्यास, दर्जेदार वेबसिरीज (असूर), विचारमंथन यांसारख्या गोष्टी आपला वेळ फार सुंदर करुन आपला सर्जनशील आणि तितकाच सृजनशील विकास करु शकतात.
टिप्पण्या
Tuzya likhanachi sukshm paddhat, chotya chotya points vr evdha kholvar vichar karne khup kautakaspad ahe mazya sathi. Social sites vr jokes post karnya peksha jr asach vel satkarni lavla tr nkki kahitri changle changes pahayla miltil swhatamadhe....
😊👍
😍👍
����