Rajmachi Trek



राजमाची

दिनांक : १५ आॅगस्ट २०१८

          गेल्या चार वर्षापासून रखडलेला ट्रेक अखेर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पूर्ण झाला. माझ्या Estimate Trek च्या List मधला हा राजमाची ट्रेक आता My Treks च्या Done List मध्ये गेला होता. खुप आनंदी होतो.
          लोणावळ्यावरुन परत येण्यासाठी रेल्वेचं आरक्षण सुध्दा झालं होतं. सगळी तयारी झाली होती. आणि तो दिवस उजाडला. पहाटे ३:४५ ला उठून भरभर सगळं आवरुन मलुंड स्टेशन गाठलं. स्वप्नेश घाटकोपरवरुन ४:५८ च्या खोपोली ट्रेन मध्ये बसला. मी पण त्याच ट्रेन मध्ये ५:१४ ला बसलो. मोबाईल, पाॅवरबॅंक, चार्जर, पैशाचं पाकीट वगैरे सामान पावसाने ओलं होऊ नये म्हणून प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गाठ बांधून सेफमध्ये ठस केलं. तेव्हा आठवलं की महाराष्ट्र राज्य सरकारने प्लास्टिक बंदी केली आहे, म्हणूनच मला पिशव्या सापडत नव्हत्या. पण मग आता दुसरा पर्याय पण नव्हता माझ्याकडे. मग ७:४३ ला कर्जत स्टे. ला पोहोचलो. घरुन चपात्या बांधून आणल्या होत्या. ट्रेन पकडायला उशीर नको म्हणून घरुन काहीच खाऊन निघालो नाही. इथे पोहोचल्यावर नाष्टा केला आणि पश्चिमेला स्टेशनच्या बाहेर पडलो. श्रीराम पूल पर्यंत चालत जायचं होतं. वाटेत शाळेची मुले गणवेशात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी जात असलेली दिसली. त्यांना पाहून मला माझ्या शाळेचे दिवस आठवले. पुढे एक फुगेवाला तिरंगी रंगाचे फुगे घेउन उभा असलेली दिसला.
          १५-२० मिनिटे चालल्यावर आम्ही श्रीरामपूलापाशी येऊन थांबलो. तिथे ६ आसनी रिक्षा होत्या. ३० रु. प्रत्येकी असं भाडे ते १० कि.मी. वर असलेल्या कोंदिवडे गावापर्यंत जाण्यासाठी आकारतात. पण त्या ६ Seater मध्ये १० माणसं बसल्याशिवाय ती तिथून हलणार नव्हती. आणि फक्त आम्हाला दोघांना तिकडे नेण्याचे ३५० रुपये त्याने सांगितले. आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता म्हणून मग आम्ही दुसऱ्या रिक्षावाल्याकडे गेलो. तो त्याच्या दोन आसनी रिक्षाने २५० रुपयात आम्हाला न्यायला तयार झाला. कर्जत ते कोंदिवडे हे १० कि.मी. चं अंतर रस्ता खराब असल्याने आम्हाला ४० मि. लागले. त्याने कोंदिवडे गावाच्या थोडं पुढे कोंढाणे गावातल्या खारवंडी या आदिवासी पाड्याजवळ सोडलं. तिथून आम्ही ट्रेकच्या सुरुवातीची वाॅर्मअप पायपीट चालू केली. बाजुने उल्हास नदी वाहत होती. चहूबाजुने हिरवंगार गवत. छान वाटत होत.
डावीकडे स्वप्नेश आणि मी





तर या वाटेने चालत आम्ही कोंढाणे लेणी नावाच्या पाटीजवळ येऊन पोहोचलो. इथून एक मळलेली पायवाट डावीकडे जाताना दिसली. त्या वाटेने चालू लागलो..





३ ते ४ तास लागतात राजमाची पर्यंत पोहोचायला असं ऐकून होतो. पण आम्हाला ३ तासातच पूर्ण करायचा होता. कारण लोणावळ्यावरुन ७:२५ ची परतीची ट्रेन पकडायची होती. बोलता बोलता पहिल्या टेकडीवर येऊन पोहोचलो. इथून पुढे सपाट जमीन होती. समोरचा धुक्यात लपलेला डोंगर आणि पायाखालून वाहणारे झरे मनाला आनंद देणारे होते.






एक तासाची पायपीट केल्यानंतर लांबूनच घनदाट कीर्र् झाडीत लपलेली कोंढाणे लेणी दिसून आली.


कोंढाणे लेणी
कोंढाणे लेणी

          कोंढाणे लेणीत एक चैत्यगृह आणि आठ विहार आहेत. एक अर्धाकृती स्तूप आहे. ही लेणी इ.स.पू. दुसऱ्या शतकात हीनयान पंथीयांनी कोरली असल्याचा अभ्यासकांचा निष्कर्ष आहे. भारतीय पुरातत्त्व विभागातर्फे येथील काही भागाचे डागडुजीचे काम चालू आहे. या लेणीत आल्यानंतर आजुबाजुचा परिसर फार सुंदर आणि मनमोहक दिसतो. प्रथमदर्शनी आपल्याला वेधून घेतो तो या लेणीवरुन कोसळणारा धबधबा. त्याखाली भिजण्याचा मोह आम्हालाही आवरला नाही..










छोटी चैत्यगवाक्षे आणि छज्जे व त्याबाजुला असलेले विहार
चैत्यगृहाची मजबूत कमान
चैत्यगृहाची दर्शनी बाजू

विहारातून घेतलेले धबधब्याचे सुंदर दृश्य
विहारातील भग्न झालेले स्तंभ
विहारातील कक्ष
विहारातील कक्ष



          कोंढाणे लेणीचं अद्भुत दृश्य पाहून पुढच्या प्रवासाला निघालो. इथपर्यंत आम्हाला एक तास लागला. अजुन आम्हाला दोन तासाची चढाई करायची होती.










खडी चढण पार करुन घेतलेली विश्रांती
          इथपर्यंत सुखावणारे झरे पुढे नाहीसे होतात कारण समुद्रसपाटीपासून आम्ही उंचीवर आलो होतो. त्यामुळे जे झरे आम्हाला खाली भेटले त्याचंच मोठं रुप म्हणून आता ते आम्हाला पुढे ओसंडून वाहणारे धबधबे होऊन दिसणार होते. उंची वाढत चालली होती तसतसं धुकं सुध्दा वाढू लागलं होतं. थोडं पुढे चढून गेल्यावर समोरच्या पहाडावर सुंदर लहान धबधबे दिसतात.


पुन्हा पठार पुन्हा जंगल
पश्चिम घाटातील हे जंगलाचे सुंदर दृश्य


अद्भुत वृक्ष, माणसाला जखडलय जणू, की वृक्षाला ?
मधली बाणाने दाखवलेली खाली उतार असलेली दिशा निवडायची



          अाणि पोहोचलोच शेवटी फक्त पावणेतीन तासाची चढाई करुन उधेवाडी गावात तेही वेळेच्या आधी. आता इथे गावातून बऱ्याच वाटा वेगवेगळ्या ठिकाणी जात होत्या. कोणी बाहेर दिसत नव्हतं. मग एका घराजवळ जाऊन विचारायला गेलो तर त्यांनी जेवायची आॅर्डर द्यायची आहे का असंच आम्हाला विचारलं. तेवढा वेळ नव्हता आमच्याकडे. त्यांनी वाट दाखवली मग आम्ही चालू लागलो.
          राजमाची किल्ल्याचे दोन बालेकिल्ले आहेत. 'श्रीवर्धन' आणि 'मनरंजन'. आम्ही आधी आमच्या वाटेवर पहिला असणारा आणि श्रीवर्धन पेक्षा लहान म्हणून मनरंजन करायचं ठरवलं आणि चालू लागलो. पावणेबारा वाजले होते. जंगलाची वाट पार करुन २५ मिनिटाच्या आतच मनरंजनचा बांधीव बुरूज दिसला. थोडं पुढे गेल्यावर तटबंदी आणि बऱ्यापैकी सुस्थितीत असलेला गडाचा बांधीव दरवाजा लागला. प्रवेशद्वाराच्या वर मध्यभागी कमळपुष्पाचे शिल्प कोरले होते. त्यातून आत प्रवेश केल्यावर द्वार रक्षकांच्या देवड्या होत्या. वर गेल्यावर बुरुजावर जाऊन दूरवरचा नजारा पाहायचा होता पण इतकं धुकं होतं की काही काहीच दिसलं नाही. बरोबर नाही वाटलं तेव्हा आम्हा दोघांना. दिवाळीत यायला पाहिजे होतं असं वाटत होतं. कारण राजमाचीवरुन आम्हाला प्रबळगड, ईरशाळगड, ढाक बहीरी, कर्नाळा इतके गडकोट दिसणार होते. पण हिरमोड झाला.



खोदीव पायऱ्या









शुभशकुनाचे प्रतीक असलेले कमळ






मनरंजनवरुन दिसणारा श्रीवर्धन


          मनरंजनवरचा हा सर्व परिसर व्यवस्थित पाहून आम्ही लगेच तो उतरलो. कारण वरती इतके धुके होते की आम्हाला बरोबर वाट कोणती आहे हे कळत नव्हतं. आणि वाट चुकवण्याची चूक करायची नाही असं ठरवलं आणि म्हणून तो पूर्ण न करताच उतरलो. तरी आमच्या काही गोष्टी पाहायच्या राहिल्याच अशी चूरचूर सारखी लागून होती. वाईट वाटलं पण मग माझी मैत्रीण मला म्हणाली होती की, " गरजेचं नसतं प्रत्येक वेळेस सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला अनुभवायला मिळतीलच. कधी कधी जितकं मिळालंय तेवढं घेऊन पुढे जावं लागतं विशेषत: जेव्हा आपल्याकडे त्या सर्व गोष्टी करण्यासाठी तितकासा वेळ नसतो. कारण त्या गोष्टी करण्याच्या नादात इतर महत्त्वाच्या गोष्टी निघून जातात."  म्हणून आम्ही महत्त्वाच्या वास्तू पाहून तळ उठवला. मध्ये तिथे एका बुरुजावर उभ्या उभ्याच सोबत आणलेलं थोडसं खाऊन घेतलं. मग निघलो.
          निघताना आंग्लभूमीतल्या परदेशी पाहुण्यांचा टापटीप शिस्तबध्द घोळका आमच्या मागून किल्ल्यावर जाताना आम्हाला भेटला आणि तेव्हाच तिथे किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यापाशी पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि चिप्सच्या फेकलेल्या पाकीटांवर नजर गेली. वाईट वाटलं मला, मग रागही आला. परदेशी पर्यटकांना इथे आल्यावर भारताचे असे दर्शन पाहायला मिळते ही लाजीरवाणी गोष्ट आहे. एतिहासिक वास्तूंवर आपली नावे लिहायची आणि बाण खुपसून प्रेमाचा अनोखा आविष्कार प्रकट करायला अशांना याच जागा मिळतात! सोबत आणलेला कचरा सोबतच न्यावा तो फेकू नये इतक्या साध्या गोष्टी आपण दुर्लक्षित करतो.  ते त्यांची संस्कृती त्यांचा ठेवा जपतात मग आम्हा भारतीयांनाच का काही वाटत नाही. ज्या तोफांनी स्वराज्याचे रक्षण केले, ज्या एवढ्या वजनदार तोफा मावळ्यांनी इतक्या उंचीवर नेऊन बसवल्या प्रसंगी त्या तोफांचे वार झेलून आपले प्राण गमावले, ज्या तोफा दसऱ्याच्या दिवशी हळद कुंकू वाहून हार घालून पुजल्या जायच्या त्याच तोफांवर बसून फोटो काढताना आजची पिढी दिसते, ज्या गडकोटांवर महाराजांनी आणि मावळ्यांनी हर हर महादेव ची किलकारी घुमवली, ज्या बुरुजांनी शूरयोद्ध्यांचे पोवाडे एकले त्याच गडकोटांना आजची ' So Called ' तरुण पिढी डाॅल्बी स्पीकर्सवरुन मोठ्या आवाजात अश्लिल गाणी एकवत आहे, सणावाराच्या दिवशी ज्या दिपमाळांवर आणि तटबंदीवर दिवे पणत्या लावल्या जात होत्या त्याच तटबंद्यांवर पोरांसोबत पोरीसुध्दा पोस देत समोरचा नजारा न्याहाळत सिगरेटींचा धूर आकाशात सोडताना दिसले. त्यांच्या अशा वागण्यातून अापल्या महाराजांच्या इतिहासाबद्दल असलेली अनास्था आणि कमालीची असंवेदनशीलताच दिसते. त्यांना हे सर्व करण्यातून आनंद मिळत असेलही पण निसर्गाच्या सान्निध्यात आल्यावर निसर्गाप्रती आपला ' Right Approach ' कसा असायला पाहिजे हे त्यांना समजले पाहिजे.
          जाताना वाटेत उतारावर असं मस्त जंगल लागलं. खाली उतरुन आता आम्ही दोन्ही किल्ल्यांच्या खिंडीत आलो होतो. तेथे भैरवनाथाचे मंदिर होते. त्यावर पत्रा आणि आत्ताच्या काळातील बांधणीचे शिवाय रेती सिमेंटने बांधलेले ते मंदिर होते. त्यामुळे ते इतिहासकालीन आहे यावर विश्वास बसत नव्हता. कारण हल्ली कोणत्याही शेंदूर फासलेल्या दगडांना बसवून त्याभोवती चार भिंती उभारुन चंदेरी चमकणारा पत्रा वर टाकला की लगेच दगडाचं देवळात रुपांतर होतं. अर्थात मंदिर जुनंच, फक्त त्याची अलिकडच्या काळात मरम्मत केली गेली आहे. समोर तीन दीपमाळा, लक्ष्मीची मूर्ती, शेंदूर लावलेली घोड्याची मूर्ती आणि दोन तोफा होत्या पैकी एक तोफ अर्धीच होती. तिचा अर्धा भाग तुटलेला होता. काही वीरगळ सुध्दा होत्या.

भैरवनाथाचे मंदिर


वीरगळ आणि तुटलेली तोफ


लक्ष्मीची मूर्ती आणि घोड्याची मूर्ती

 दीपमाळा
          एवढं सगळं पाहून झाल्यावर आम्ही श्रीवर्धन च्या दिशेला कूच केली. खालपासूनच आम्हाला अलिकडच्या काळात बांधलेल्या पायऱ्या लागल्या. पूर्वी येथे श्रीवर्धनच्या बालेकिल्ल्यावर नेणारा राजमार्ग असावा. पुढे जाऊन पायऱ्यांची जागा कातळात खोदलेल्या कठीण पायवाटेने घेतली. वाट इतकी कठीण नव्हती परंतु पावसाळ्यात साधी सोपी वाटसुध्दा कठीण होऊन जाते. १५ मिनिटाच्या चढणीनंतर श्रीवर्धन किल्ल्याचा पहिला बुरुज आणि ढासळलेल्या स्थितीतला पहिला दरवाजा दिसला. प्रत्येक किल्ल्याचे काही एक खास वैशिष्ट्य असते. जसे की मी इतर किल्ले पाहिलेत ज्यांची रचना वेगवेगळी आहे. जसे जुन्नर तालुक्यातील हडसर, जीवधन तसेच पालीचा सरसगड, पेठचा कोथळीगड आदी किल्ल्यांचे दरवाजे हे अखंड कातळात खोदून काढले आहेत तर घनगड, कावनई, कर्नाळा आणि हा राजमाची या किल्ल्यांचे दरवाजे हे लहान मोठे दगड एकावर एक रचून व त्यांच्या चिरांमध्ये चुन्याचा घाना भरुन उभारले गेले आहेत.

श्रीवर्धनकडे जाणारा राजमार्ग

श्रीवर्धनचा बुरुज

कातळात खोदलेल्या पायऱ्या



पहिल्या दरवाज्याकडे नेणारी वाट


धुके सरल्यानंतर दिसणारे खिंडीतील भैरवनाथाचे मंदिर

दरवाज्याचे पडलेले दगड

पडलेला दरवाजा

पहारेकऱ्यांच्या देवड्या

उध्वस्त दरवाज्याच्या कमानीचे अवशेष

उध्वस्त झालेला दरवाजा

कमानीचे अवशेष

वाड्याचे अवशेष
          श्रीवर्धनच्या दरवाज्यातून प्रवेश करताच पहारेकऱ्यांच्या देवड्या म्हणजेच त्यांना राहण्यासाठी असलेली गडावरची जागा आहे. दरवाज्याची संपूर्ण पडझड झालेली आहे व कमानीचे अवशेष सुध्दा तिथेच बाजुला करुन ठेवलेले पाहायला मिळतात. पुढे तटबंदीच्या कडेकडेने चालू लागतो.





दुहेरी तटबंदीकडे जाणारी वाट

श्रीवर्धनची दुहेरी तटबंदी



दुहेरी तटबंदीकडे उतरणारी वाट






भक्कम तथा चिरेबंदी





           एक वाट बुरुजाच्या खाली जाताना दिसली. ही चोरवाट नसून दुहेरी तटबंदीकडे जाणारी वाट आहे. अशीच दुहेरी तटबंदी राजगडाच्या सुवेळा माची, संजीवनी माची आणि पद्मावती माचीला असलेली दिसते परंतु या दोन्ही तटबंद्यांमध्येही दोन्ही गडाच्या विशेष बांधणीच्या कारणाने फरक आढळतो. हे पाहून झाल्यावर उजव्या हातानेच पुढे गेल्यावर पाण्याच्या काही जोडटाक्या दिसतात. पाणी पिण्यालायक आहे परंतु ते खोल आहे त्यामुळे  पाणी घेताना काळजी घ्यावी लागते. सोबत स्टीलचा पेला असलेला बरा. तटबंदीचे काही दगड पडण्याच्या स्थितीत होते त्यामुळे तटबंदीवरुन चालताना सावधगिरी बाळगावी लागते. मागे प्रतापगड फिरण्यासाठी आलेल्या कुटुंबातील एका मुलाचा तटबंदीचा दगड वरुन खाली पडल्याने मृत्यू झाला होता. अशी घटना ऐकून अंगावर शहारा येतोय म्हणून गडकोटांची तसेच घाटवाटांची भटकंती करताना 'Right Approach' असणं गरजेचं आहे.

कधीही पडू शकतील असे तटबंदीचे दगड

झाडांनी वेढलेला पाण्याचा हौद

तटबंदीवरुन दिसणारा दरवाजा

टाक्यांचा समूह
कातळात खोदलेली गुहा

सरळ जाणारी मधली वाट बालेकिल्ल्याकडे तर उजवीकडची वाट कातळधारा दृश्याकडे





दरवाज्याच्या वर मध्यभागी असलेले गणेशशिल्प 
              पुढे एक कातळात खोदलेली गुहा लागते. हे धान्यकोठार अथवा राहण्यासाठी ही गुहा वापरली जात असावी. गुहेत एकच मोठी खोली व दोन छोट्या खोल्या होत्या. या गुहेत पाहण्यासाठी आम्ही आमची मोठी टाॅर्च काढली आणि त्या गुहा पाहू लागलो. नंतर इथे दिसणाऱ्या या चहाविक्रेत्याने आम्हाला आमच्या टाॅर्च बद्दल विचारलं. मला इथे येण्याआधीच माहीत होतं की राजमाची किल्ल्यावरच्या या उधेवाडी गावात वीज नाही. त्यामुळे टि.व्ही., रेडिओसारखी करमणुकीची साधने तर सोडाच पण अत्यावश्यक सुविधा सुध्दा नाहीत. २१ व्या शतकात पुणे मुंबईसारख्या Metropolitan शहरांच्या हाकेच्या अंतरावर असूनदेखील पर्यटनाचे Hotspot असलेल्या या ठिकाणी अजून वीजेच्या तारा पोहोचल्या नाहीत. एके ठिकाणी मुंबईला शांघाई करायचे, भारताचा न्ययाॅर्क करायचा आणि दुसऱ्या बाजुला विजेचा शोध लागून शतके उलटली तरीही उधेवाडीतील लोक अजुनही अंधारात आहेत. त्या माणसाला विचारलं आम्ही की, मग तुम्ही मोबाईल कुठून चार्ज करता दादा? ते म्हणाले लोणावळ्याला जाऊन Light आणतो. म्हणजे मोबाईल असो बॅटरी असो.. प्रकाश हवा तर २० कि.मी. लांब सार्वजनिक वाहतूक आणि चांगले रस्ते नसताना चालत एवढ्या लांब जायचं, कशासाठी तर वीज आणायला.
          जेव्हा माणसाचं आयुष्य हे मुलभूत गरजा पूर्ण करण्यात आणि आपल्या नशीबाशी झगडण्यात जातं तेव्हा माणूस प्रगती आणि विश्वाशी स्पर्धा यांसारख्या संकल्पनांपासून फार दूर पडतो किंबहूना त्याला काही फरकच पडत नाही की आपल्या देशाचा पंतप्रधान कोण आहे म्हणून. दारिद्र्याने आणि सामाजिक विषमतेने पिचलेले हे लोक मग असेच किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना चहा नाष्ट्याची सोय करुन देऊन आपल्या दिवसाची गुजराण करतात. पर्यटकांची गर्दी नसते तेव्हा मात्र यांना तोटा होतो. मग शेतीपासूनच जेवढं मिळेल तेवढं कमावतात.
          त्यांनी आम्हाला विचारलं की ही बॅटरी द्यायची आहे का तुम्हाला? ती बॅटरी स्वप्नेशची होती त्याने ती त्यांना देऊ केली. त्याने अशीच कोणतेही पैसे न घेता दिली पण ते मात्र पैसे देत होते त्याचे. तुमचा कोणाचा जर या किल्ल्याला भेट देण्याचा योग आलाच तर गावातील एका माणसाला तरी आर्थिक नाही पण अशी मदत जरुर करा. मदत केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो दुसरीकडे कुठे मिळणार नाही.
          पुढे सरळ वर जाणारी बालेकिल्ल्याची वाट पकडून गेलो. वाड्याचे अवशेष दिसले. तसच पुढे गेल्यावर बालेकिल्ल्यावर पोहोचलो. मध्यभागी एक ध्वजस्तंभ होता. पण इथे आज स्वातंत्र्यदिन असूनदेखील तिरंगा फडकत नव्हता. ध्वजस्तंभाखाली अनेक मुलंमुली बसून मोठ्याने इंगजी गाणी बोलत अनौचित्याचं उदाहरण कसं असतं हे दाखवत होती. तिथे एक क्षणसुध्दा न थांबता आणि त्यांच्या आनंदाला दुजोरा न देता तेथून आम्ही शेवटच्या ठिकाणी निघालो.

वाड्याचे अवशेष

ध्वजस्तंभ




          धुके इतकं होतं की फक्त पायापुरता वाट सोडून काही दिसत नव्हतं. कोणत्या दिशेला जाऊ कळत नव्हतं. किल्ल्यावर ठिकठिकाणी सूचनाफलक होते पण ते वाचण्यालायक नव्हते. तितक्यात वाऱ्याची दिशा बदलली, थंड वारा या दिशेला आला आणि धुकं सरलं तेव्हा आम्हाला दूर असलेला तो कातळधरा बुरुज दिसला. तेव्हा फार आनंद झाला. राहावलं नाही आणि पळत सुटलो त्याच्याकडे.




कातळधरा बुरुज


          त्या बुरुजाकडे जाताना मधे एक मोठे पाण्याचे बांधीव हौद लागते आणि समोरच कातळधरा बुरुज दिसतो.
खुप वेळ तिथे थांबलो होतो पण धुकं काही सरलं नाही त्यामुळे निराश होऊन निघालो. त्या बुरुजाखालून एक छोटी चोरवाट किल्ल्याच्या बाहेर नेते. ती चोरवाट नाही वाटत पण किल्ल्यात प्रवेश करणारा राजमार्ग सुध्दा नाही वाटत. गडावरुन दुसऱ्या बाजुने उतरण्यासाठी केलेली ती वाट असावी. मग आल्या वाटेने आम्ही निघालो गड उतरायला.

उजवीकडून वर जाणारी वाट बालेकिल्ल्याकडे तर डावीकडची वाट किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी जाते

खाली जो चिखलाने मळलेला वेडावाकडा रस्ता दिसतोय त्या रस्त्याने जाण्यास सज्ज
          जाताना एका पुरातत्त्व खात्याच्या माणसाला विचारलं की लोणावळा स्टेशनला जायला किती वेळ लागेल, गाड्या वगैरे आहेत का? ते म्हणाले चालत ४ तास लागतात पण तुम्ही पटापट गेलात तर ३:३० तासात पोहोचाल. ३:३० तासात तिकडे पोहचणं जरा कठीण वाटलं. इकडच्या स्थानिक लोकांना सवय आहे, ते करत असतीलही. पण आता आम्हाला कर्जत वरुन चढून येऊन पुन्हा इथे एवढं दमून घेतल्यावर पुढे इतक्या पटापट अंतर कापायला जमेल का ही फिकीर होती आणि गाड्या वगैरे करायच्या म्हटल्या तर ते Tata Sumo वाले २५०० रु. घेतात. बरं हे असं दमलो म्हणून गाडीने जाणं पण बरोबर वाटत नाही कारण मग या अशी भटकंतीची ट्रेकची मजा निघून जाते. साधारण अर्ध्या तासात आम्ही खाली पोहोचलो. दुपारचे २:३० वाजले होते. आम्ही आमच्या ठरलेल्या वेळेत होतो त्याचा मला भारी आनंद झाला. सगळ नियोजनबध्द झालं म्हणून मग तिथे घरगुती हाॅटेलात जेवायला बसलो. आम्ही साधं वरण भात भाजी चपाती मागवलं त्या थाळीचे १३० रु प्रत्येकी असे पैसे झाले. आणखी पुढे १००-१२० रुपयात मिळू शकलं असतं असं वाटलं पण तेवढं शोधत बसण्याचा वेळ नव्हता. भराभर खाल्लं. जेवण मस्त होतं. डोंगराच्या कुशीत शहरापासून इतकं लांब असूनही घरात जेवतोय असं वाटलं पापड लोणच्यापासून काकडी, बीट, गाजर सुध्दा चवीला होतं. जेवणाची चव तर झकासच होती. पण जेवता जेवता अजुनही निघायची चिंता होती कारण ७:२५ ची इंद्रायणी एक्सप्रेस पकडायची होती. त्यानुसारच आम्ही आमच्या वेळा ठरवल्या होत्या. जाताना मोबाईल पाॅवर बॅंक भिजलाय की नाही ते बघितलं आणि लगेच निघालो.
          ३:३० वाजले होते. आम्ही आता अाल्या मार्गे जात नव्हतो तर विरुध्द दिशेने चाललो होतो. रस्ता खुप खराब होता. चिखलाचा वेडा वाकडा तो रस्ता त्यातून जाताना बूट चिखलातच अडकला आणि पाय बाहेर निघून आला. असे पण विनोदी किस्से झाले. थोडं अर्धा पाऊण तास अंतर कापल्यावर जो कातळधरा धबधबा आम्हाला किल्ल्यावरुन दिसला नव्हता तो आत्ता दिसला. तेव्हा मला आपण मगाशी किती उंचावर होतो हे कळलं. मी आधी मागे वळून तो राजमाची किल्ला पाहिला.अजुनही त्याचा तो बुरुज दिसत नव्हता ज्यावर थोड्या वेळापूर्वी आम्ही उभे होतो. पण खालून राजमाची किल्ला फरच सुरेख दिसत होता. पण इथून फक्त राजमाचीचा एकच बालेकिल्ला दिसत होता, श्रीवर्धन. दुसरा मनरंजन हा त्याच्या मागे होता. किल्ल्याची तटबंदी फारच भक्कम वाटते येथून. आणि त्याच्यासमोर हा कातळधरा धबधबा या किल्ल्याला जिवंतपण आणतो. अगदी शोभून दिसतो.

उल्हास नदीचे उगम : कातळधरा धबधबा

श्रीवर्धनचा अभेद्य बुरुज


सुख पावसापरी यावे, आयुष्य अन हे भिजावे
स्पर्शून आसवांना ह्या मातीत ओल्या रुजावे
जरी दाटले आभाळ हे तरी नवा रंग हो..
घन आज बरसे मनावर हो..
घन आज बरसे अनावर हो..
चाहूल सुखाची त्यावर हो..
घन आज बरसे मनावर हो..



          १५ मिनिटे इथे थांबू मनमुराद आनंद घेतला या क्षणाचा. माझ्या आवडत्या संगीतकाराचं निलेश मोहरीर चं गाणं मनात बोलत निघालो. पुढे दीड तास चालल्यावर कातळधरा धबधब्यापाशी येऊन पोहोचलो. हा उल्हास नदीचा उगम. बोरघाटाला छेदत कोकणातून प्रवास करीत अरबी समुद्रात विलीन होते ती उल्हास नदी. वेळ कमी होता म्हणून तिथे गेलो नाही. पायपीट जोरात होती, वेग वाढवत होतो. पण दोन, तीन तास झाले मग पाय दुखायला लागले. दम नव्हता लागला पण पाठीत जबर वेदना होऊ लागल्या होत्या. वाटेत अनेक जणांना विचारलं किती वेळ उरलाय, अजुन किती लांब आहे. प्रत्येक जण वेगवेगळा वेळ सांगत होते. काही ३ तास बोलायचे काही ४ तास, एक जण तर चक्क अर्धा तास लागेल फक्त म्हणाला. हसलो आम्ही खुप. आता आम्हाला कोणीच दिसत नव्हतं चालताना जोरात खिखल मागे उडवत जाणारे दुचाकी वाले आणि चिखलात अडकलेली आपली चारचाकी काढणारे सोडून. कारण आम्ही खुप पटापट १००-२०० जणांना सहज ओव्हरटेक करुन खुप पुढे आलो होतो.
          पुढे गेल्यावर कळलं की आम्ही चुकीच्या वाटेने आलो. सगळे सरळ सरळ जा म्हणत सरळ गेलो तर एक वाकडी वाट पण घ्यायची होती हे कोणी सांगितलंच नाही. मग एका म्हाताऱ्याने लांबून बांधावरुन ओरडून सांगितलं की लोणावळ्याची वाट मागेच राहिली. तुम्ही खंडाळ्याच्या वाटेवर आहात सध्या. आता पुन्हा पाठीमागे जायचं म्हटलं तर ट्रेन हुकण्याचे टक्के जास्त. असा वैतागलो होतो, तसाच रस्त्यावर आडवा पडलो, आकाशाकडे बघत झोपलो. काहींना या चिखलातून Off Road Bike Riding करायला मजा येत होती. त्यांच्याकडे लिफ्ट मागितली, म्हणालो थोडं पुढे सोडा आम्हाला तर कोणी माणुसकी दाखवायला तयार नाही. मग याच वाटेने पुढे एक तास चालल्यावर डेला कंपनी येते, तिथून रिक्षा मिळतात लोणावळ्यासाठी असं दोन तीन जणांनी सांंगितलं. कसेबसे तिथे नागमोडी वळणे चिखल तुडवीत पोहोचलो. रिक्षावाले ३०० रुपये सांगत होते. बरं शेअरींग ने जावं तर गाडी पण लगेच भरत नव्हती. त्या ३ सीटर रिक्षामध्ये त्या अजब माणसाला १० सीटे बसवून गजब काहीतरी करायचं होतं. ५ कि.मी. चा प्रवास उरला होता आणि ४० मि. राहिले होते. १ तास काही केल्या लागणार होता. मग ट्रेन सुटू नये म्हणून आम्ही थोडं पुढे जाऊन दुसरी रिक्षा पकडली. त्याने २०० रुपयात सोडलं आम्हाला लोणावळा स्टेशनला. 
          आता आमच्याकडे थोडा वेळ उरला होता मग जाताना लोणावळ्याची चिक्की आठवणीने घेतली. वेळेच्या आधी प्लॅटफाॅर्मवर पोहोचलो होतो त्यामुळे फार भारी वाटलं. ट्रेन यायला अजुन १० मि. होते. ट्रेन आल्यावर आमच्या आरक्षित जागेवर बसलो. हे आम्ही मुद्दामच केलं कारण इतकं दमून ट्रेक करुन आल्यावर जनरल डब्यात उभं राहून जायचं म्हणजे मुर्खपणाच. मागे एकदा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे १ जानेवारी २०१३ तो लोणावळ्याचेच लोहगड आणि विसापूर हे दोन्ही किल्ले राहूल आणि मी आम्ही एकाच दिवसात केले आणि येताना याच इंद्रायणी एक्सप्रेसने आलो ते जनरल डब्यात उभे राहून. खुप गर्दी होती. तिथेच मला चक्कर आली होती. ट्रेनमध्येच गर्दीत बसून घेतलं जागीच, तो धडा चांगला मिळाला मला म्हणून तेव्हाच ठरवलं की पुढच्या वेळेस तयारीतच यायचं. आता मात्र आपण मस्त बसलेलो असतो आणि बाकी ट्रेकर्स असे उभ्याने प्रवास करतात तर मला माझे जुने दिवस आठवतात आणि त्यांची कीव सुध्दा येते. मग रात्री वेळेत घरी पोहोचलो.
          तर असा हा माझा १५ आॅगस्टचा ट्रेक. याआधी २६ जानेवारीला याच वर्षी मनीषसोबत ईरशाळगड फत्ते केला होता. आजचा ट्रेक मस्तच झाला. खरंतर मला या ट्रेकला यायचं नव्हतं. इच्छाच नव्हती कुठे बाहेर निघायची. पण बरं झालं मी आज आलो ह्या ट्रेकला. खुप मोकळं झाल्यासारखं वाटलं. Free झालो मी. फार मस्त वाटतय.
इतका मोठा ट्रेक झाला. घाटवाटा आणि किल्ल्याची वाट असा डबल आनंद घेतलेला हा पहिलाच ट्रेक. Endurance तर वाढवतोच ट्रेक पण कधीकधी जगण्याची उमेदही दाखवतो. नवीन मार्ग आणि एखाद्या संकटातून बाहेर पडण्याची इच्छाशक्ती मला माझ्या या गडकोटांच्या या उन्हाळी हिवाळी आणि खत्तरनाक् पावसाळी भटकंतीतून सापडते. म्हणून हा अट्टाहास गडकोटांचा..

टिप्पण्या

Saurabh Kajawe म्हणाले…
Superb! A mesmerizing experience....Felt like I just did the trek...While reading your beautiful words...!!👍