खुप दूर निघून गेलोय मी आता
जशी वाट सापडेल तसा..
सोबत कुणाचीच नाही, कारण..
एकटेपणा हीच माझी सोबत झालेय.
पाठी वळून पाहतो तर माझे आसुसलेले डोळे दूरवर पाहतात.. पण कोणीच दिसत नाही.
दिसतात ती फक्त बाभळीची काटेरी झाडे,
ज्यांवर बसलेली गिधाडे,
माझे लचके तोडण्यासाठी आहेत तयार.
उन्हाचे चटके माझ्या डोक्यासोबत त्यातले थंड निकामी झालेले विचारही जाळतायत.
पायाला खेटून असलेली सावली..
तिच्याकडे क्षणभर थांबून पाहतो तर ती सावली मला जुन्या पण गोड अशा हुरहुर वाटणाऱ्या आठवणींना आकार घेण्यास सांगते.
कलात्मक बुध्दिला गंज चढलाय..
न्यूनगंडाच्या शून्यतेत कसले आलेत आकार..!?
जी सावली माझ्यापासून दूर न जाऊनही,
मी एकटा उरलोय.
माझं मन मी... एकलकोंड्याप्रमाणे,
स्वातंत्र्यात असतानाही कोंडून घेतलय.
मावळत्या सूर्याबरोबर माझ्यातल्या काळोखात
दुःखाचं छत्र घेऊन येणाऱ्या अंधारमय दुनियेत दुःखसंपन्न असा 'मी' विलीन होतोय...
- मयुर
"समुद्रावरील सुर्यांत" |
टिप्पण्या