मी एक बेट आहे. दूर ओसाड एक असा बेट जो या अथांग सागरात एकटाच आहे. तसे माझ्या बरोबरीला अनेक बेट आहेत पण माझ्या सोबतीला दूरदूर पर्यंत कोणीच नाही. ते सर्व माझ्यापासून खुप लांब पोहोचलेत किंवा त्यांनी एक विशिष्ट उंची गाठलीये. मी मात्र मागे एकटाच उरलोय. हा महासागर अनेक दुषित थेबांनी भरलाय ज्याची मला भीती आहे. त्या लाटा माझ्या किनारी लागतात तर कधी तुफान घेऊन आदळतात. माझे अस्तित्त्व हळू हळू संपवू पाहतायत. मी माझ्या किनारी वाळू आणि लाटांचा होणारा फेसाळ संगम पाहून आनंद मानत असतो आणि खालूनच वर आभाळी पुढे सरकणारे चित्र विचित्र ढग न्याहाळत दिवसही पुढे सरकवत असतो. प्रत्येक दिवस माझ्या बेटांवरुन जाणारे पक्षी आणि लांब कुठेतरी दिसणारी भली मोठ्ठी पण माझ्यासाठी छोटी अशी जहाजे पाहून स्वतःशीच रडत असतो. तेव्हा मात्र माझे अश्रू त्या सागराला भिडतात आणि मिसळून त्यात अदृश्य होतात. शेवटी त्या पापी समुद्रात दोन निष्पाप दुःखाश्रू गेल्याने काय फरक पडतो.. ते त्या महाकाय निर्दयासमोर आणि त्यातल्या असंख्य प्रदूषितांसमोर काहीच नाहीत. माझ्या बेटावरील नारळाची सुंदर बने वादळाकरवी नष्ट झाली. माझी विचारशक्तीच त्याने जणू नष्ट केली. 'सुंदर बेट ओसाड झालं आणि समुद्राच्या आनंदाला उधान आलं..' हळू हळू लवकरच असे होईल की मला असा मंगलमय वेढा घातलेल्या याने, माझा किनारा सर्व बाजूने व्यापत जाऊन स्वतःकडे विलीन करत गेला तर माझे अस्तित्त्वं एकाएकी नष्ट करायला, त्याला तरी अजिबात वेळ नाही लागणार. आता फक्त सुर्योदय आणि सूर्यास्त पाहत दिवस काढायचे इतकंच पण या सगळ्यात सर्वात वाईट म्हणजे मी मरुही शकत नाही.. फक्त मेल्यासारखं आयुष्य जगू शकतो. तेव्हा वाटतं की कुणीतरी असावं माझ्यासोबत. यावं त्या लाटांना छेदत मार्ग काढत अलगद तरंगत एक होडी.. छोटीशी का होईना. माझ्या किनाऱ्यावर लागावी.. आणि दाखवून द्यावं की माझ्या वाळूला स्पर्शू जाणाऱ्या लाटेपेक्षा होडी हीच किनाऱ्यावर डौलदारपणे उभी असलेली शोभून दिसते. ऐट त्या होडीकडेच असते, लाटेकडे नसते., जी वाळूला क्षणिक सुख देऊन तिला भिजवलेली सोडून पुन्हा सागरी परतते. होडी मात्र माझी इच्छा आहे. जी वादळ, वारा आणि पावसाला भेदत भयान लाटांवरून मार्ग काढत एकट्या दुकट्या बेटाच्या काठाला लागते."माझे डोळे आसुसलेत त्या होडीला पाहायला. माझ्या सोबत असायला हवी ती होडी."
टिप्पण्या