रिकाम्या बुध्दीने चालत, भरलेल्या दु:ख-विचारांचे ओझे सांभाळत.. चालत, जरा बेसावध.. स्वत:च्याच आयुष्याशी, एकटेपणाशी झगडत चालतोय.. तोल सावरत.. थोडा बेसावध. त्याला तशी सोबत आहे त्याच्या प्रेयसीची पण तिच्यातला रितेपणा त्याला जाणवला आणि सारे पाशबंध तुटले. अन्यायाची जाणीव दु:खाच्या संवेदनेपेक्षा तीव्र होती याची चीडचीड सुध्दा तो व्यक्त करु शकत नव्हता, जणू तो पूर्वीसारखं पेट घेणंच विसरुन बसलाय. अव्यक्त नैराश्य हेही त्याच्या बोचऱ्या दु:खासोबत आलं. माणसाचं सुख क्षणिक असतं पण दु:खाचं काय? दु:ख हे रौद्रवेशी प्रलयासारखं असतं. ज्याचा सौंदर्यावर झालेला आघात जरी क्षणिक असला तरी परिणाम हा अनंत असुखी असतो. त्या वादळाला वाहिलेला माणूस फक्त घुसमटत राहतो, आक्रोश करीत असतो. त्याच्या वेदना खऱ्या असतात. त्याचं दु:ख इतकं खरं असतं की ते कधी पुसलं जाऊ शकत नाही. त्याचं जीवनसौंदर्य आता कुरुप झालंय, निस्तेज झालंय. इतकं असूनही त्याचं वैफल्य कोणी पाहू शकत नाही, त्याचं दु:ख कोणी समजू शकत नाही. त्याच्या वेदना कोणी अनुभवू शकत नाही. त्याची प्रेयसीही त्याला आनंद देऊ शकत नाही. आपली प्रेयसीच आपल्याला समजू शकत नाही त्यामुळे दु:खात पडलेली ही भर पाहून त्याचं मन कोसळतं. त्याला ती आवडेनाशी होते, नकोशी होते. तिच्या डोळ्यात आपल्याबद्दल आपुलकीही त्याला जाणवत नाही. तिचा सहवासही रितेपणाचाच. अशी एकटेपणाची सोबत फक्त क्लेशदायक असते. त्यामुळे त्याला व्यभिचारी विचार छळू लागतात. कारण तो एकटा राहू शकत नाही. त्याला पुन्हा एकटेपणाची सवय करुन घ्यावीशी वाटते पण तो एकटेपणाही आता येत नाही. कटू आठवणी सोबत चालतच असतात. त्या आठवणींमध्ये आपल्यावरील अन्यायाचाही अंश असतो आणि तिच्या थोड्याशा प्रेमाचा, जे काही काळापुरताच होतं. अशा मिश्र भावनांनी त्रस्त होऊन तो एकटी वाट धरुन चालू लागतो..
टिप्पण्या