खुप दिवस मनात चालू होतं की एखाद्या लक्षात राहिलेल्या ट्रेकवर काहीतरी लिहूया पण कधी वाटलं नव्हतं की माझ्या ट्रेकविषयीच्या पहिल्या ब्लाॅगची सुरुवात एखाद्या गडकिल्ल्यापासून न होता भिमाशंकर च्या जंगल ट्रेकने होईल. या ट्रेकची एक विशेष बाब म्हणजे कर्जत स्थानकावर जेव्हा सगळे या त्या टोकाची माणसे भेटली तेव्हा अचानक भिमाशंकर ट्रेक ला जायचं ठरलं. नाहीतर माझं कर्जत-पळसदरी जवळच्या भिवगड आणि सोनगिरी या किल्ल्यांवर जायचं ठरलं होतं. त्या किल्ल्यांची सर्व माहिती, येण्याजाण्याच्या वाटा हे सगळं पाठ करुन झालं होतं. पण मध्येच असं भिमाशंकर कसं निघालं समजेनाच. मग सहा जणांमध्ये मतं पाडली. भिमाशंकर आणि दोन ट्रेकमध्ये भिमाशंकरला बहुमत मिळालं. मग काय.. निघालो. शिवाय स्वप्नेश चा मित्र विक्रम हा तिथे जाऊन आला होता त्यामुळे काही अडचण नव्हती. नाहीतरी हा ट्रेक आमच्या यादीत होताच फक्त तो आज लागलीच ठरेल असं नव्हतं ठरलं. अाज एक किल्ला ठरला आणि दुसऱ्या दिवशी तो फत्ते केला असं बऱ्याचदा झालं होतं. विसापूर आणि लोहगड हे दोन ट्रेक ३१ डिसेंबरच्या रात्री ठरवून १ जानेवारीच्या नववर्षी एकाच दिवशी फत्ते केले होते. पण हे असं पहिल्यांदाच.
कर्जत एस.टी. स्टॅंडवरुन कशेळे पर्यंत एस.टी.ने गेलो आणि तिथून प्रत्येकी ५० असे ३०० रु. तिकडच्या लोकल ट्रांसपोटच्या गाड्या असतात त्याने खांडस या पायथ्याच्या गावी गेलो. कर्जतपासून खांडसपर्यंत १ तास लागला. तिथून २ कि.मी. वर एक पूल लागतो. इथून आमचा ट्रेक सुरु झाला.
आमचा ग्रुप - डावीकडून मी, केतन. विक्रम (ट्रेक गाइड), स्वप्नेश, मनीष आणि आम्ही सगळे ज्याच्याकडे पाहतोय तो फोटु काढणारा अमेय. |
ही वाट छ. शिवाजी महाराजांच्या काळापासून प्रचलित आहे. भिमाशंकरला जाण्यासाठी कर्जत, मुरबाड तसेच संबंधित गावातील लोक फार पूर्वीपासूनच या घाटवाटांचा वापर करत आहेत. ठाणे आणि पुण्यातील जुन्नरला जोडणारी नाणेघाटाची वाटही ही अशीच आहे. तर अशा या घाटवाटेने जाताना अचानक समजलं की माझ्या डाव्या पायाला Ligament injury झालेय. मला समजलच नाही की न धडपडता, पाय मुरगळला नसता असं अचानक कसं झालं. बाकीचे दोस्त पुढे गेले असताना एका दगडावर बसून पाय वाकडा तिकडा करुन माझा मीच fix केला. कारण रानावनातून, डोंगरदऱ्यातून भटकताना कोणाला लागलं, पडलं, साप चावला असे घटनाप्रसंग आले की काय करायचं हे अचूक माहीत होतं. शिवाय एक ट्रेकर म्हणून अशासारख्या प्रत्येक situation साठी प्रत्येकाला तयार राहावं लागतं. दोस्तलोग पुढे निघून गेले होते. ते कधीच थांबत नाहीत. थांब म्हटलं तरी थांबत नाहीत, जोपर्यंत काही गंभीर बाब नसेल. माझेही त्याबद्दल दुमत नाही. शेवटी सगळे professional ट्रेकर्स आहेत. पाय complete बरा करुन मी लगेच त्यांना पुढे मिळालो.
दोन तास झाले आणि एका माचीवर येऊन पोहोचलो. इथून समोरच पदरगड धुक्यातून कसा भक्कम उभा ठाकलेला दिसत होता. धुकं चंचल वाहत होतं आणि तो गड तसाच स्थिर उभा. त्याचा बुरुज, कलावंतीणीचा महाल या गोष्टी ओळखायला येतील इतपत स्पष्ट दिसत होत्या. तर डाव्या बाजुला आमच्या गाईड विक्रमने शिडी घाट असल्याचे सांगितले. धुकं नसेल तर शिडी पण स्पष्ट दिसते. शिडी घाटाने ४ तास लागतात तर गणेश घाटाने ५ ते ६ तास लागतात. पाठीमागे वळून पाहिलं तर पायथ्याचं खांडस गाव धुकं सरल्यामुळे दिसायला लागलं होतं.
पुढे थोडं चालत गेल्यावर एका झऱ्यापाशी थांबून फोटो काढले. अमेयच्या मोबाइलमध्ये फोटो चांगले येतात त्यामुळे आणि तो छत्री पकडून न भिजता ट्रेक करत असल्यामुळे सगळ्यांनी त्यालाच फोटोग्राफर बनवलं होतं. ओढ्यातून चालताना बूटातून पाणी जायचं तेव्हा फार थंड लागायचं. पाय सुन्न पडायचे.
ह्या झऱ्यातून पुढे गेल्यावर एक कणीसवाला होता. तिथे चुल पेटवलेली होती तेव्हा माझा फोन आणि पावर बॅंक वरचेवर शेकवून घेतली. गरम झाल्यानंतरसुध्दा फोन सुरु होईना. मग निराश होऊन चालू लागलो पण पुढे खळाळते झरे आणि मोठे ओढे पाहून फार बरं वाटलं. त्यातून चालताना, पाय ओले करताना आयुष्यभराचा थकवा दूर झाल्यासारखा वाटला.
माचीवरुन दिसणारे खांडस गाव |
माचीवरुन दिसणारे खांडस गाव |
थोडं पुढे गेल्यावर चढ लागला. काही ट्रेकर्स चढताना आम्हाला भेटत होते. असं कोणी आलं की त्यांना मागे टाकण्याची आमची सगळ्यांची सवय आहे. आम्हाला आमच्या वाटेत आणि चालण्याच्या वेगाच्या मधे कुणी आलेलं चालत नाही. त्यात मला तर कोणी म्हणजे कोणीच चालत नाही, अगदी माझ्या ग्रुपमधलेसुध्दा. ट्रेक lead करायला मला फार आवडतं कारण आपण पुढे असतो त्यामुळे येणारं प्रत्येक दृश्य अगोदर आपल्याला दिसतं ही भावनाच खुप भारी आहे. नाहीतर कोणी आपल्या समोर असेल आणि एखादा सुंदर धबधबा पाहून आपल्या आधी तो ओरडेल.
मी, स्वप्नेश, केतन पटापट एकएकाला मागे टाकत जात होतो. अमेय आणि मनीष छत्री सांभाळत पाठून हळू हळू येत होते. पुढे गेल्यावर धुकं हळूवार सरताना पाहिलं आणि त्यानंतर जे दृश्य दिसलं ते खरच नजर स्थिरावणारं आणि लक्षात राहिल असंच होतं. समोरच्या भिमाशंकराच्या डोंगरावर एकापुढे एक असे खुप सारे उंचच उंच धबधबे होते. ते पाहून मागची सगळी दु:खे, ताण-तणाव कुठल्याकुठे पळून गेली होती. मगासपासून पटापट चाला, यायला उशीर होईल, येताना फोटो काढू अशी कटकट करणाऱ्या स्वपेशचंही काही न ऐकता त्या कड्यावर जाऊन जोरजोरात ओरडू नाचू लागलो. मग सगळेच आले आणि खुप फोटो काढले.
मी, स्वप्नेश, केतन पटापट एकएकाला मागे टाकत जात होतो. अमेय आणि मनीष छत्री सांभाळत पाठून हळू हळू येत होते. पुढे गेल्यावर धुकं हळूवार सरताना पाहिलं आणि त्यानंतर जे दृश्य दिसलं ते खरच नजर स्थिरावणारं आणि लक्षात राहिल असंच होतं. समोरच्या भिमाशंकराच्या डोंगरावर एकापुढे एक असे खुप सारे उंचच उंच धबधबे होते. ते पाहून मागची सगळी दु:खे, ताण-तणाव कुठल्याकुठे पळून गेली होती. मगासपासून पटापट चाला, यायला उशीर होईल, येताना फोटो काढू अशी कटकट करणाऱ्या स्वपेशचंही काही न ऐकता त्या कड्यावर जाऊन जोरजोरात ओरडू नाचू लागलो. मग सगळेच आले आणि खुप फोटो काढले.
रुपेरी उन्हात.. धुके दाटलेले.. दुधी चांदणे हे.. जणू गुंफलेले.. |
पुन्हा चढ, पुन्हा ट्रेकर्स आणि आडव्या येणाऱ्या झाडांचा आधार घेत सरसर वर चढत गेलो. पुढे तर एक धबधबा आडवा आला. तिथे पण मस्त मजा केली, नाचलो खुप, वर धबधब्यावर चढलो.
इथपर्यंत ज्या जंगलातून आलो ते जंगल आता कमी होऊन कडे यायला लागले. निसरडे कातळकडे, शेवाळलेले खडक यावर जपून काळजीपूर्वक माझ्या भाषेत भराभर-सरसर चढत गेलो. पाऊस पडत होता तो माझ्या गालावर आदळत होता. तिरपा नाही तर अक्षरश: काटकोनात आडव्या रेघेसारखा तो पाऊस आडवा पडत होता. पडत नव्हताच, आडवा असल्यामुळे पाऊस जात होता असंच म्हणावं लागेल. खुप काळानंतर मी आश्चर्य पाहत होतो. असा आडवा पाऊस त्या दिवशी पहिल्यांदाच अनुभवला. कानात ते तीक्ष्ण थेंब टोचत होते. एका ठिकाणी तर धुकं इतकं मस्त गडद होत गेलं की ते पाहून राहवलं नाही आणि कड्याचा कठीणपणा, बाजुची खोल दरी कसलाच विचार न करता पटकन त्या धुक्यावर चढून गेलो. त्या धुक्यात हरवून जावं वाटत होतं. आणि अशा ठिकाणी आल्यावर हरवून जाण्याची पण एक मजा असते. जिवंतपणी स्वर्ग पाहत होतो.
हे पार केल्यावर एक वाट दाट अंधारलेल्या जंगलात जाताना पाहिली. मी एकटाच तिथे जोरात धावत गेलो. एकच वाट आणि दुतर्फा घनदाट झाडी. तिथे एखाद्याला असं एकट्याला भीती वाटेल इतकं ते भयान होतं पण मला ते सुंदर वाटलं म्हणून मी मुद्दाम धावतच गेलो. अंधारबनात आल्यासारखं वाटू लागलं. पाठीमागे वळून पाहावं तर मी एकटाच या भयान जंगलात. हे भिमाशंकर अभयारण्य. चालताना आजुबाजुला वानर दिसत होते, निरनिराळ्या पक्षांचे आवाज येत होते, पक्षांचा किलबिलाट आणि घुबडाचा आवाजही कानावर येत होता आणि त्यातून अलगद बरसणाऱ्या पावसाच्या रिमझीम सरींचा आवाज. हा आवाज एरवीही असतो पण आपल्याला आपला गोंधळ इतका प्रिय असतो की ही अद्भूत शांतता ऐकण्याचे भानच कोणाला राहत नाही. इथे येऊन काही लोकांना धांगडधिंगा कारायचा असतो, जोरात गाणी लावून नाचायचं असतं, काहींना मांसाहार करावा वाटतो तर काही महानुभाव चक्क दारु पितात. अर्थात कोणी कसं जगावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. दारु प्या अथवा धिंगाणा करा. कोणाला कशाने आनंद मिळेल हे आजकाल सांगताच येत नाही. मला तर या गोष्टीत या अशाचप्रकारे हरवून जाण्यात आनंद मिळतो जिथे आपल्या फोनला रेंज नसते. जेव्हा अशा नेटवर्क च्या बाहेर दूर कुठे उंच जाऊन हरवल्यावर जो आनंद होतो तो या असल्या क्षुद्र गोष्टींमध्ये नक्कीच नसेल. अजुन पुढे चढून गेलो. आता मात्र दम लागत होता. चढण खुप लागली होती. पुढे गेल्यावर बरेच मद्यसम्राट वाटेने चढताना भेटलेच. चढायच्या अवस्थेत नव्हते पण तरी मस्ती खुप. अशा निसर्गात ते गटात न बसणारे शब्द वाटत होते. एक काळ होता जेव्हा काहीच लोक पाठीवर सॅक अडकवून एका हाताने काठी टेकवत शांततेत फक्त निरीक्षणे करीत जायचे. गळ्यात दुर्बीण आणि बॅगेत टाॅर्च. पण हल्ली चित्र विचित्र झालंय. हल्लीचे निसर्गप्रेमी एका हातात दारूची बाटली आणि बॅगेत पण बाटल्याच भरुन भटकंती करताना दिसतात. काही लोक दारु पित नसले तरी इतर नको ते कमी दर्जाचे उद्योग करायला येतात त्यामुळे हल्ली कर्जत, पुणे, लोणावळा return ticket काढून विकटगड, लोहगड, सिंहगडावर जाणारे सगळेच स्वत:ला ट्रेकर समजायला लागलेत.
बोलता बोलता मनीष च्या एक एक भारी भारी विनोदांवर हसता हसता वर पोहोचलो. श्री क्षेत्र भिमाशंकर.. ५ ते ६ तास लागले इथवर यायला. दर्शनाची रांग खुप मोठी होती. पायऱ्यांनी उतरता उतरता समोर धुक्यात मग्न भाविकांचा जयघोष सुरु होता तो कानांवर येत होता. खुप धुके वर. मंदिर तर दिसत नव्हतं. थंडीसुध्दा खुप होती. रांग तर संपता संपत नव्हती. मग दुसऱ्या एका रांगेत गेलो जिथून खिडकीतून दर्शन मिळत होतं. खिडकीपुढे आलो तर देवच दिसत नव्हता, काय चाललंय काय, फक्त माणसांची गर्दी. नास्तिक माणूस मी पण तरीही लाचार म्हणून शेवटच्या पर्यायाखातर पिडा टळो आणि सुख मिळो बोलून थोडा वेळ हात जोडून उभा राहिलो. नंतर दोन चार फोटो काढले आम्ही एकत्र आणि घरी जायला निघालो. हे लोक परतीसाठी गाडी पाहू लागले . मला ते शेवटपर्यंत मान्य नव्हतं. कारण जोपर्यंत खाली उतरुन जात नाही तोपर्यंत ट्रेक पूर्ण होत नाही. पण उशीर झाला होता. घरी लवकर जाणार असल्यामुळे आम्ही टाॅर्च आणल्या नव्हत्या त्यामुळे अंधारात कसं उतरणार म्हणून तिथून गाडीने मंचरला गेलो. जे माझ्या गावापासून अदमासे १०० कि.मी.वर होतं. तिथून कल्याण १०० कि.मी आणि मग पुढे मुंबई.. म्हणजे ६ तास तरी आणि तेही गाडी लगेच मिळाली तर. आता हे मला जमणार नव्हतंच. मग मंचर ५० कि.मी वर होतं तिथपर्यंत गेलो. रात्रीचा माळशेज घाटाचा जोखमीचा प्रवास नको म्हणून मंचर मध्येच थांबलो. माझ्या वहिनीचं माहेर इथेच असल्यामुळे तिला फोन करुन राहण्याची सोय केली.
भिमाशंकर रोड |
भिमाशंकर मंदिर |
खिडकीतून घेतलेलं दर्शन |
अाता सगळ्यात मोठं काम म्हणजे घरी फोन करुन सांगायचं की आम्ही भिमाशंकर करुन मंचरमध्ये आलोय. घरी फोन करुन सांगितलं एका दमात की मी मंचर मध्ये आहे आणि भिमाशंकर करुन आलोय. आता मंचर मध्ये वहिनीच्या घरच्यांकडे राहणार आहे मी, केतन आणि मनीष. बाकी स्वप्नेश, अमेय आणि विक्रम इथूनच पुण्याला निघणार आहेत. बाबांना माझ्या मोठा धक्का, म्हणाले की " तुम्ही कर्जत ला गेलेलात ना, मग एकदम मंचर? " पुण्यावाले पुण्याला जायच्याआधी आम्ही एका हाॅटेलात बसून थोडं खाऊन घेतलं. व्हेज सूप पिऊन बरं वाटलं. फोटो घेतले सगळे अमेयच्या मोबाइल मधून. मग ते निघाले आणि आम्हाला घ्यायला वहिनीचा भाऊ आला. मग एका गाडीवर चार जण बसून गेलो घरी. खडकी पिंपळगाव. घर एकदम मस्त. हात पाय धुवून लगेच जेवायला बसलो. खुप भूक लागलेली. चटकदार जेवण बनवलेलं. जेवणानंतर लगेच झोपलो.
आज दुसरा दिवस, २३ जुलै. पहाट तर दोन इंद्रधनुष्याने सुखद बनवली. या टोकापासून तर त्या टोकापर्यंत मस्त इंद्रधनुष्य होता आणि विशेष म्हणजे दोन इंद्रधनुष्य होते. एकावर एक. वरचा अस्पष्ट होता. हे भौतिकशास्त्रात होतं आम्हाला की वरचा इंद्रधनुष्य अस्पष्ट असतो आणि त्याखालचा एकदम स्पष्ट. त्याचेही फोटो काढून घेतले आणि मग खडकी पिंपळगाववरुन ७ कि.मी. मंचरला टेम्पो मधून गेलो. खुप मजा आली. केतन आणि मी टेम्पोच्या मागे उभे राहून आलो. सेल्फी व्हिडीओ पण भारी आला. मग मंचरवरुन शिवाजीनगर पुणे आणि तिथून भुसावळ एक्सप्रेसने मुंबई. कालपासून मुंबई-ठाणे-कर्जत-खांडस-भिमाशंकर-मंचर-पुणे-मुंबई एवढा प्रवास केला. विश्वास बसत नाही. मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, चार जिल्हे. पण मस्त होता हा प्रवास.
दोन इंद्रधनुष्य |
जीव लावणारी माणसं आणि आसरा मिळाला ते घर |
खडकी-पिंपळगाव |
हा भिमाशंकर ट्रेक खुपच मस्त झाला. सगळीकडे हिरवळ, धबधबे, धुके चिरत वरुन कोसळणारा पाऊस, आणि माझे हे मित्र, त्यांच्याशिवाय इतकी मजा आलीच नसती. हा भिमाशंकर ट्रेक माझा सगळ्यात आवडता ट्रेक ठरला. कोथळीगड, हरीहर ट्रेक, गोरखगड, विकटगड आणि अशा अनेक आवडत्या ट्रेकपैकी हासुध्दा एक.
टिप्पण्या