आठवण

ती माझ्या प्रेमासाठी नाहीये हे मला नंतर कळतं, मी तिच्यासोबत आयुष्य घालवण्याचा ठाम निर्णय नाही घेऊ शकणार हे मला माहीत असूनही काही काळ गेल्यानंतर एक गाणं माझ्या भोवती ताल धरु लागतं आणि मी ते डोळे मिटून शांतपणे ऐकू लागतो. त्या गाण्यात शिरुन त्या गाण्याशी जोडलेल्या माझ्या जुन्या आठवणींत मी हरवून जातो. मग मला ती पुन्हा नव्याने आवडू लागते. मी पुन्हा तिच्या प्रेमात पडतो, कारण मला ते सर्व सुंदर जुने क्षण नव्याने जगायचे असतात. मला तिचा तो सहवास तसाच पुन्हा अनुभवायचा असतो. ते क्षण इतके खास असतात की त्यापेक्षा गोड काहीच वाटत नाही. का असं होतं ? कारण तो तिच्यासोबतचा जो पहिलाच क्षण मैत्रिचा, ओळखीचा, एकमेकांना जाणून घेण्याचा, एकमेकांविषयी भावना निर्माण होण्याचा आणि एकमेकांना एकमेकांविषयी सवय होण्याचा असतो तोच मुळात खुप सुंदर क्षण असतो. ती वेळ आयुष्यभर लक्षात राहण्यासारखीच असते. आणि ते पूर्वी घडून गेलेले, जीवनात उत्सुकता आणणारे क्षण पुन्हा यावेत आणि मन पुन्हा आनंदाने न्हाउन जावं अशी इच्छा असते. पुन्हा दोघांनी तसंच, अगदी तसंच एकत्र यावं आणि तसाच आनंद दोघांना यावा असं वाटतं. आत्ताच्या नीरस आयुष्यातून बाहेर पडून सुंदर क्षणांच्या सोबतीसाठी ती 'सुंदरता' हवी असते. पण ते आता शक्य नाही असंही नंतर लगेच वाटू लागतं. पण का असं होऊ शकत नाही हा देखील त्यानंतर लगेचंच पडणारा प्रश्न..! ती मला भेटावी, ते सर्व क्षण मला पुन्हा तसेच तिच्यासोबत मिळावेत असंच वाटत राहतं. पण 'ती' आजुबाजुलाच असते पण ते क्षण मात्र परत येत नाहीत. ती येते जीवनात पुन्हा पण त्या अमूल्य क्षणांना परत आणू शकत नाही हे देखील वाटत राहतं. प्रयत्न केले खुप गोष्टी प्रयत्नांनी घडवून आणण्याचे, पण खरच.. ती आली.. मात्र माझे तिचे ते क्षण नाही आले. कधीच नाही..
असाच एका टेकाडावर तिच्या आठवणींचा सूर्यास्त होताना पाहिला..
   

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
A Boy's Mind is Nicely Explained.We advise a boy to forget the girl but it seems near to impossible for the boy.Maybe for girls also.But,Now our age is to build a Good Career and we should focus on that only.