![]() |
| फोटो आभार: गुगल इमेजेस |
आकाशात उंच भरारी घेणारा भारतातील एक अत्यंत परिचित शिकारी पक्षी घार (Black Kite - Milvus migrans). तीक्ष्ण नजर, वेगवान झेप आणि कबुतरे, उंदीर, सरपटणारे प्राणी किंवा मासे यांची शिकार करण्याची उपजत क्षमता. निसर्गाने तिला एक कुशल शिकारी म्हणून घडवले आहे.
परंतु इतका सक्षम असूनदेखील तुम्ही घारीला त्यांच्या अगदी समोर असणारे सोपे भक्ष सुद्धा शिकार करून पकडताना पाहणार नाही. त्यासाठी तुम्हाला त्यांच्या मूळ अधिवासात जावे लागते. जिथे कापशी (Black-Winged Kite), ब्राह्मणि घार (Brahmini Kite) सारख्या निष्णात घारी तुम्हाला त्यांचे शिकारी कौशल्य दाखवताना दिसू शकतील. मग असे काय झाले की गरूड (Eagle), बाज (Buzzard), हारीण (Hawk), भोवत्या (Harrier) यांचा समावेश असलेल्या एकाच गणातून (Order) येत असूनदेखील अशी वेळ त्यांच्यावर आली.
शतकानुशतके या घारींनी शहरातील परिसंस्थेचा समतोल शांतपणे राखला आहे. कीड नियंत्रण असो किंवा मृत प्राण्यांचे अवशेष फस्त करून परिसर स्वच्छ ठेवणे असो; मानवाच्या नजरेआड राहून या पक्ष्यांनी निसर्गाची आजवर खुप सेवा केली आहे.
पण शहरांनी काळानुरूप खेळाचे नियमच बदलले.
उघड्यावरील मासळी व मटण मार्केट, रस्त्याकडेला पडणारा कचरा व कचऱ्याचे अवाढव्य ढिगारे... एका शिकारी पक्षासाठी याचा एकच अर्थ होता : असे अन्न, ज्यासाठी आता शिकार करण्याची गरज उरली नव्हती.
कारण घारींचे जे नैसर्गिक अन्न आहे, ते त्यांच्या अधिवासात आता मिळेनासे झाले आहे.
आणि याची काही प्रमुख कारणे:
- शहरीकरण: शहरांमध्ये सिमेंटची जंगले वाढल्यामुळे शेते, मोकळी मैदाने आणि झाडे कमी झाली. जिथे पूर्वी घारींना नैसर्गिकरीत्या साप, सरडे किंवा इतर रानटी उंदीर मिळायचे, तिथे आता फक्त काँक्रीट आहे.
- कीडनाशकांचा वापर: मानवाने उंदीर मारण्यासाठी किंवा शेतीसाठी जी विषारी औषधे वापरली, त्यामुळे घारींचे नैसर्गिक खाद्य (सावज) एकतर कमी झाले किंवा ते विषारी झाले.
- परिसंस्थेतील बदल: जेव्हा शहरात कचरा वाढतो, तेव्हा तिथे नैसर्गिक सावजांपेक्षा घाणीवर जगणारे जीव (उदा. गटारातील उंदीर किंवा प्रक्रिया केलेले मांस) जास्त प्रमाणात उपलब्ध होतात.
याचा परिणाम काय होतो?
जेव्हा घारीला तिचे 'मूळ सावज' (उदा. मैदानातील उंदीर ज्यासाठी तिला हवेत झेप घ्यावी लागते) मिळेनासे होते, तेव्हा ती मेहनतीची शिकार सोडून सोपा पर्याय निवडते.
सोपा पर्याय म्हणजे काय?
- मटण मार्केटमधील उरलेले तुकडे.
- कचऱ्याच्या ढिगावरील सडलेले अन्न.
- लोकांच्या टाकलेले, त्यांच्याकडून हिसकावलेले पदार्थ.
यातून निर्माण होणाऱ्या समस्या:
जसे आपण सकस घरगुती जेवण सोडून फक्त 'जंक फूड' खाल्ले तर आपले शरीर कमकुवत होते, तसेच घारींचे झाले आहे. नैसर्गिक शिकार (मूळ सावज) न मिळाल्यामुळे त्यांना योग्य पोषण मिळत नाही, ज्यामुळे त्यांच्या पुढच्या पिढ्या कमकुवत होत आहेत आणि त्यांची 'शिकार करण्याची उपजत कला' नष्ट होत चालली आहे.
आज दिल्ली, मुंबई व हैदराबाद सारख्या शहरांमध्ये घारी कचऱ्याच्या डेपोवर घिरट्या घालताना दिसतात, कत्तलखान्यांच्या बाहेर घुटमळतात आणि मटण विक्रीच्या दुकानाबाहेर दबा धरून बसतात. काही ठिकाणी या घारींनी माणसांच्या हातातून अन्न हिसकावून घेण्याइतपत हिंमत (आणि सवय) विकसित केली आहे.
अनुकूलन साधण्याची क्षमता
'वाइल्डलाईफ एसओएस' (Wildlife SOS) सारख्या संशोधन आणि बचाव संस्थांच्या मते, नैसर्गिक अधिवास नष्ट होणे आणि मूळ सावज कमी होणे, यामुळे घारींच्या जीवनशैलीत हा बदल झाला आहे. पण ही केवळ जगण्यासाठी केलेली धडपड नाही, तर आपण निर्माण केलेल्या 'सोप्या' व्यवस्थेशी त्यांनी जुळवून घेतलेले हे अनुकूलन आहे.
हे वरवर पाहता निर्धोक वाटू शकते, पण जेव्हा शिकारी पक्षी शिकार करणे थांबवतात, तेव्हा त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण परिसंस्थेवर होतात. शहरांमध्ये कबुतरे, उंदरांची संख्या अफाट वाढते आणि त्यांच्यासोबतच आजारांचा धोकाही वाढतो.
या बदलात एक 'मूक' हानी देखील लपलेली आहे.
घारींची पिल्ले ही मोठ्या घारींना शिकार करताना बघून शिकार करायला शिकतात. जर शिकार करण्याची प्रक्रियाच मंदावली, तर पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही नैसर्गिक उपजत वृत्ती (Instinct) कमकुवत होत जाईल आणि हे परावलंबित्व एका मोठ्या किंमतीत येईल.
बचाव कार्यात गुंतलेल्या संस्थांना अशा घारी आढळत आहेत ज्या निर्जलीकरण (Dehydration), विजेच्या तारांमुळे झालेल्या जखमा आणि प्रक्रिया केलेल्या कचऱ्यातील अन्नामुळे कुपोषणाने ग्रस्त आहेत. उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेदरम्यान अशा शेकडो पक्ष्यांना वाचवावे लागते.
घारींनी हा मार्ग स्वतःहून निवडलेला नाही.
आपण जे शहर उभे केले, त्याच्याशी तिने फक्त जुळवून घेतले.
जर शहरांमुळे या पक्ष्यांचे वर्तन बदलू शकते, तर ही शहरेच ही परिस्थिती सुधारू शकतात. त्यासाठी आपल्याला काही पावले उचलावी लागतील :
• कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करणे.
• उघड्यावरील कचरा डेपो बंद करणे.
• कचरा विल्हेवाटीची सक्षम यंत्रणा उभारणे.
कारण हा प्रश्न फक्त एका पक्षाचा नाही; आपण नकळत ज्या निसर्गचक्राची पुनर्रचना करत आहोत, त्याबद्दलचा हा गंभीर इशारा आहे.

टिप्पण्या